U19 Women T20 World Cup : गेल्या वर्षी भारतीय क्रिकेटप्रेमींना एक आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकला. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने हा विजय साकारला. आता काही महिन्यांनी पुन्हा एकदा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा T20 विश्वचषकाचा फायनलचा सामना रंगण्यात शक्यता निर्माण झाली आहे. १९ वर्षाखालील महिलांचा टी२० विश्वचषक सध्या मलेशियात सुरु आहे. स्पर्धेत आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात असून भारताने सामना जिंकल्यास पुन्हा एकदा IND vs SA अशी टी२० फायनल रंगेल.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मॅकॉन (०) आणि लायन्स (२) स्वस्तात बाद झाल्या. ल्युसी हॅमिल्टन (१८) आणि कामोआ ब्रे (३६) या दोघांनी काही काळ झुंज दिली. या दोघी बाद झाल्यावर लारोसा (७), हसरत गिल (१), एन्सवर्थ (१) बेसिंगवेट (२) या देखील झटपट माघारी परतल्या. एला ब्रिस्को हिच्या नाबाद २७ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकात ८ बाद १०५ धावा केल्या. आफ्रिकेच्या अशले वॅन वीक हिने चार बळी टिपले.
आफ्रिकेची फायनलमध्ये धडक
या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केली. सलामीवीर जेमा बोथा हिने ३७ धावा केल्या. कायला रेयनिक हिने २६ धावा केल्या. तर कारबो मेसो हिने १९ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे आफ्रिकेला विजय मिळवता आला. या विजयासह ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर गेला आणि आफ्रिकेने विजय मिळवला.