चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या नवव्या हंगामात दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 'ब' गटातील पहिली लढत रंगल्याचे पाहायला मिळाले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पाकिस्तानच्या मैदानात तिरंगी मालिका खेळलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघाविरुद्धच्या मोठ्या विजयासह स्पर्धेची सुरुवात अगदी धमाक्यात केलीये. कराचीनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं निर्धारित ५० षटकात ३१५ धावा केल्या होत्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियानंतर दक्षिण आफ्रिकेनं केली खास कामगिरी
अफगाणिस्तानच्या संघाला २०८ धावांवर रोखत आफ्रिकेच्या संघानं हा सामना १०७ धावांनी जिंकला. धावफलकावर ३०० पार धावसंख्या लावताना दक्षिण आफ्रिकेनं खास विक्रम केला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियानंतर अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिका हा दुसराच संघ ठरला आहे. जाणून घेऊयात या खास रेकॉर्डबद्दल
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील चौघांच्या 'फिफ्टी प्लस' खेळीनं सेट झाला खास रेकॉर्ड
पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील सलामीवीर रायन रिकल्टन याने १०३ धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय कॅप्टन टेम्बा बवुमा (५८ धावा), रॅसी व्हॅन डर दुसेन (५२ धावा) आणि एडन मार्करम (५० धावा) या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. आफ्रिकेच्या ताफ्यातील चौघांनी एका डावात ५० पेक्षा अधिक धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत याआधी फक्त भारतीय संघानेच अशी कामगिरी करून दाखवली होती. दक्षिण आफ्रिकानं खास रेकॉर्डसह टीम इंडियाची बराबरी केल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघातील खेळाडूंनी पाक विरुद्धच्या सामन्यात केली होती अशी खास कामगिरी
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय संघाने हा पराक्रम करून दाखवला होता. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बर्मिंघमच्या मैदानात भारतीय संघातील चौघांनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हा डाव साधला होता. या सामन्यात रोहित शर्मानं (९१ धावा), शिखर धवन (६८ धावा), विराट कोहली (८१ धावा) आणि युवराज सिंग (५३ धावा) यांनी अर्धशतके झळकावली होती.