Join us  

IND vs SA: भारताला सुखद धक्का! दुसऱ्या कसोटी सामन्यातून आफ्रिकेचा घातक गोलंदाज बाहेर

IND vs SA Test Series: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 12:19 PM

Open in App

भारताला दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर नेहमीच कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागला आहे. आतापर्यंत एकदाही टीम इंडियाला आफ्रिकेला त्यांच्यात घरात जाऊन पराभूत करता आले नाही. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. यजमान संघाने सलामीचा सामना जिंकून ३२ वर्षांची परंपरा कायम ठेवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. खरं तर आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड ठोठावला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या १० टक्के दंड भरावा लागणार आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील दोन गुण देखील कमी झाले आहेत. 

दरम्यान, दुसऱ्या सामन्याच्या आधी भारतीय संघाला सुखद धक्का बसल्याचे दिसते. कारण दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज गेराल्ड कोएत्जी दुखापतीमुळे अखेरच्या सामन्याला मुकणार आहे. पहिल्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नव्हती. पण, आफ्रिकेच्या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत होता. त्यामुळे भारतीय फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. कोएत्जीने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात केवळ एक बळी घेतला, तर दुसऱ्या डावात त्याला बळी घेता आला नाही. पहिल्या सामन्यात कगिसो रबाडाने सर्वाधिक सात बळी घेऊन भारतीय फलंदाजीची कंबर मोडली. याशिवाय नांद्रे बर्गरने देखील  सात बळी घेण्याची किमया साधली.

भारताचा दारूण पराभव भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात लोकेश राहुल (१०१) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर दुसऱ्या डावात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवताना (७६) धावा केल्या. पण, 'विराट' खेळी सुरू असताना दुसरीकडे भारताच्या एकाही खेळाडूला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतल्यावर भारतीय संघावर दबाव वाढला होता. विराट कोहलीने अखेरपर्यंत संघर्ष केला पण टीम इंडियाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या ३४.१ षटकांत १३१ धावांवर सर्वबाद झाला. 

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरन, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका