नवी दिल्ली : रविवारी झालेल्या सामन्यात नवख्या नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आफ्रिकेला मोठा धक्का दिला. या पराभवामुळे आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आजचा पराभव माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट असल्याचे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी सांगितले. टी-२० विश्वचषक सुपर-१२ सामन्यात आफ्रिकेला नेदरलँड्सकडून १३ धावांनी पराभव पत्कारावा लागला. हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील सर्वात लाजिरवाणा क्षण होता, असेही प्रशिक्षकांनी म्हटले. दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांनी अलीकडेच टी-२० विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका सोडणार असल्याचे जाहीर केले होते.
माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट सामना - बाउचर उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या शेवटच्या सुपर-१२ सामन्यात नेदरलॅंड्सच्या संघाचा पराभव करायचा होता, परंतु त्यांना मोठा सामना गमवावा लागला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बाउचर यांनी म्हटले, "हा माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट सामना आहे. मला वाटते की हे खूपच निराशाजनक आहे कारण एक खेळाडू म्हणून तुम्ही किमान अजूनही सामन्यात टिकून राहू शकले असता. प्रशिक्षक म्हणून तुम्ही ते इतर खेळाडूंवर सोडता आणि कोणत्या खेळाडूला कुठे वापरायचे यावर भर देता. पण होय, हा नक्कीच सर्वात वाईट पराभव होता."
"मला वाटते की आमच्या योजना स्पष्ट होत्या, पण आम्ही त्यांचा योग्यपणे उपयोग केला नाही. मला वाटते की तुम्ही संपूर्ण सामना पाहिला असेल तर नेदरलँड्सने आम्हाला मागे टाकले. त्यांनी चांगल्या योजनांसह गोलंदाजी केली. मैदानावर ते आमच्यापेक्षा जास्त दबाव बनवू शकले, आम्ही त्यांच्यावर जेवढा दबाव टाकला त्याहून जास्त त्यांनी आमच्यावर दबाव टाकला." असे प्रशिक्षक बाउचर यांनी म्हटले.
पाकिस्तानच्या मदतीला नेदरलॅंड्स आला धावून दक्षिण आफ्रिकेचा पराभव केवळ पाकिस्तानसाठी आवश्यक नव्हता तर नेदरलँडसाठीही तो खूप महत्त्वाचा होता. कारण यानंतर हे कॉम्बिनेशन केले जात होते की जर पाकिस्तानने बांगलादेशला हरवले तर नेदरलँड्स पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर येईल. जे त्यांना पुढील टी-२० विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यासाठी मदतशीर असेल. नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स सामन्यानंतर म्हणाला, "आणखी एक चांगला अनुभव आला, नेदरलँड्सच्या संघाने आणखी एक मोठी उलटफेर केली. पहिले दोन सामने गमावल्यानंतर, आमच्यासाठी लक्ष्य हे होते की आम्ही अजूनही पुढील विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यासाठी खेळत आहोत. त्यामुळे दोन निकाल आमच्या बाजूने आले."
पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडकदुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, विजयासाठी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ केवळ १४५ धावा करू शकला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला, तर पाकिस्तानने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.