नवी दिल्ली ।
भारतात पुढच्या वर्षी आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. पण या स्पर्धेआधीच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं घेतलेला एक निर्णय विश्वचषकासाठी थेट पात्रता (क्विलिफिकेशन) मिळवण्यासाठीच्या मार्गात खोडा घालू शकतो.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी विश्वचषक २०२३ सुपर लीगच्या गुणतालिकेत ११ व्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत संघाला थेट पात्रता फेरीत प्रवेश मिळवणे हे मोठे आव्हान आहे. तसेच जर ऑस्ट्रेलियाचे ३० गुण झाले तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची क्रमवारीत आणखी घसरण होऊ शकते. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता फेरी गाठणे कठीण झाले आहे. कारण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची एकदिवसीय मालिका रद्द केल्यामुळे संघाला जास्त सामने खेळता येणार नाहीत.
आफ्रिकेच्या संघावर टांगती तलवार दरम्यान, जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका खेळाणे अपेक्षित होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने मालिका रद्द केली. कारण नवीन टी-२० लीगसाठी त्यांचे खेळाडू उपलब्ध असावेत अशी बोर्डाची इच्छा आहे. आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका झाल्यानंतर मायदेशी परतणार आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय मालिका रद्द झाल्यानंतर ३० गुण ऑस्ट्रेलियाच्या संघाला मिळणार आहेत, ज्यासाठी फक्त आयसीसीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
मालिका पुन्हा खेळण्यास आफ्रिका तयारऑस्ट्रेलियाविरूद्धची एकदिवसीय मालिका रद्द केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये कोंडी निर्माण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ थेट पात्रतेच्या फेरीतून बाहेर झाला तर संघाला क्वालिफिकेशन राउंडला सामोरे जावे लागेल. दरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही मालिका पुन्हा नियोजित केल्यास आम्ही खेळण्याची तयारी देखील दाखवली आहे.