Join us  

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड निलंबित; गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचाराची चौकशी

सरकारची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 11:35 PM

Open in App

जोहान्सबर्ग : गैरव्यवस्थापन, वर्णद्वेष आणि भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या क्रिकेट द. आफ्रिका (सीएसए) बोर्डाला सरकारने द. आफ्रिका क्रीडा परिसंघ तसेच ऑलिम्पिक समितीच्या माध्यमातून निलंबित केले आहे. ही चौकशी पूर्ण होईस्तोवर क्रिकेटच्या दैनंदिन संचालनासाठी बोर्डाचा कुणीही पदाधिकारी पदावर असणार नाही, असा याचा अर्थ आहे.

संघातील खेळाडूंमधला वर्णद्वेष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खालावत चाललेली कामगिरी यामुळे चर्चेत असलेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला. काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे सीईओ थबांग मुन्रो यांच्या बेबंद कारभारामुळे क्रिकेट बोर्डावर संकट ओढवले होते. त्यामुळे थबांग यांना तात्काळ पदावरून हटवण्यात आले. काळजीवाहू सीईओ जॉक फॉल आणि अध्यक्ष ख्रिस नेंजानी यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. फॉल यांची जागा कुगेंड्री गोवेंदर यांनी घेतली होती. देशातील दिग्गज खेळाडूंनी ५ सप्टेंबर रोजी आमसभा टाळल्याप्रकरणी सीएसएला धारेवर धरले होते.(वृत्तसंस्था)

आयसीसीकडून कारवाईची शक्यता

कुठल्याही देशाच्या क्रिकेट बोर्डात सरकारचा हस्तक्षेप नको,असे आयसीसीचे धोरण आहे. आजच्या कारवाईमुळे आयसीसी सीएसएवर कारवाई करण्याची शक्यता आहे. याआधी आफ्रिका संघावर २१ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर बसण्याची वेळ आली होती. त्यानंतर १९९१ साली त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. वर्णद्वेषामुळे आफ्रिकेवर बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेने आयसीसीचा नियम मोडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. कारण आॅलिंपिक समितीची कारवाई ही सरकारचा हस्तक्षेप मानला जाऊ शकतो.

टॅग्स :द. आफ्रिकाआयसीसी