जोहान्सबर्गः दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना, चेतेश्वर पुजारा टिच्चून उभा राहिला आणि अर्धशतकी खेळी करून त्यानं संघाला सावरलं. त्याच्या या चिवट, झुंजार फलंदाजीचं क्रिकेटवर्तुळात कौतुक होतंय. पण, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पुजाराच्या अर्धशतकानंतर एक घोळ घातला आणि त्यांना क्रिकेटप्रेमींचे चांगलेच फटके खावे लागले.
दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीला जिद्दीनं सामोरा जात, चेतेश्वर पुजारानं 173 चेंडूत 50 धावा केल्या. त्याचं अर्धशतक झाल्या-झाल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं त्याबद्दलचं ट्विट केलं, पण त्यात पुजाराऐवजी आर. अश्विनचा फोटो वापरला. ही चूक ट्विपल्सच्या लगेच लक्षात आली आणि भारतीय क्रिकेटप्रेमींनी द. आफ्रिका बोर्डाला धारेवर धरलं. पण बोर्डानं ही चूक सुधारण्याचं सौजन्य दाखवलं नाही.
डोळे मिटून काम करता का?, कुठल्याही क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आलेलं आजवरचं सगळ्यात वाईट ट्विट, तुम्ही घाईघाईत मेल पाठवला, पण चुकीचा फोटो अटॅच केलात, अशा प्रतिक्रिया देत ट्विपल्सनी द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाची शाळा घेतली.
दरम्यान, पहिल्या कसोटीत हाराकिरी करणाऱ्या आणि दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेपुढे लोटांगण घालणाऱ्या टीम इंडियासाठी ही कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. 'व्हाइट वॉश' टाळण्यासाठी त्यांना ही कसोटी जिंकावीच लागणार आहे. परंतु, पहिल्या डावात भारताचे रथी-महारथी ढेपाळल्यानं आता पुन्हा सगळा भार गोलंदाजांवर येऊन पडलाय.