नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याबाबत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने सोमवारी माहिती दिली. प्रिटोरियसने 2016 मध्ये आफ्रिकन संघात पदार्पण केल्यापासून 30 ट्वेंटी, 27 वन डे आणि तीन कसोटी सामने खेळले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे तो दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकातील दोन संघांचाही भाग होता.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले की, "33 वर्षीय खेळाडूने सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जाणे हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक होता." तसेच आगामी काळात ट्वेंटी-20 आणि इतर लहान फॉरमॅटकडे लक्ष वळवणार असल्याचे प्रिटोरियसने सांगितले. प्रिटोरियसने सहकार्य केल्याबद्दल त्याचे प्रशिक्षक, सहकारी आणि कुटुंबीयांचे आभार मानले तसेच फाफ डू प्लेसिसचे विशेष आभार मानले.
ट्वेंटी-20 आणि इतर लहान फॉरमॅटकडे लक्ष देणार प्रिटोरियसने निवृत्तीची घोषणा करताना म्हटले, "मी माझे लक्ष ट्वेंटी-20 आणि इतर लहान फॉरमॅटकडे वळवत आहे. मला सहकार्य केलेल्यांचे मी आभार मानू इच्छित आहे. मागील अनेक वर्षांमध्ये मी ज्या खेळाडूंसोबत खेळलो आणि ज्यांच्याविरुद्ध खेळलो त्यांचा माझ्या कारकिर्दीवर प्रभाव पडला आहे. फक्त एक किंवा दोन सांगणे खूप अवघड आहे कारण असे बरेच खेळाडू आहेत ज्यांचा माझ्यावर प्रभाव होता. कारण त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे मी स्वत:ला खरोखरच भाग्यवान समजतो."
फाफ डू प्लेसिसचे मानले आभार दरम्यान, प्रिटोरियसने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचे विशेष आभार मानले. त्याने मला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर पुन्हा एकदा संधी दिली. फाफने मला पाठिंबा दिला आणि मला एक चांगला खेळाडू बनण्यास मदत केली म्हणून त्याचे धन्यवाद मानतो असे प्रिटोरियसने अधिक म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"