जोहान्सबर्ग : पावसाच्या व्यत्ययानंतर शनिवारी रात्री उशिरा संपलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात, भारताला यजमान दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ४ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारताचा कर्णधार विराट कोहली याने यजमानांना त्यांच्या विजयाचे श्रेय देताना म्हटले की, ‘दक्षिण आफ्रिकेने चौथ्या सामन्यात चांगली जिद्द दाखविली. या विजयावर त्यांचा हक्कच होता.’भारताने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या (१०९) शानदार शतकाच्या जोरावर ५० षटकांत २८९ धावांची आव्हानात्मक मजल मारली. मात्र, यानंतर पावसामुळे दोन वेळा आलेल्या व्यत्ययानंतर, यजमानांपुढे २८ षटकांत २०२ धावांचे लक्ष्य मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना हेन्रिक क्लासेन (४३*), डेव्हिड मिल्लर (३९) आणि हाशिम आमला (३३) यांच्या जोरावर २५.३ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात २०७ धावा काढून बाजी मारली. यासह द. आफ्रिकेने सहा सामन्यांच्या मालिकेतील आपली पिछाडी १-३ ने कमी करून, मालिका बरोबरीत सोडविण्याच्या आशा कायम राखल्या.द. आफ्रिकेच्या सांघिक खेळाचे कौतुक करताना कोहलीने सांगितले की, ‘तुम्हाला दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या विजयाचे श्रेय द्यावे लागेल. माझ्या मते त्यांनी जबरदस्त जिद्द दाखविली, त्यांनी खूप चांगला खेळ केला आणि या विजयावर त्यांचा हक्कच होता. त्यांचा संघ चांगला असून, आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या क्रिकेटची अपेक्षा होती आणि त्यांनी चांगला खेळही केला. आम्हाला माहीत होते की, आणखी एक विजय मिळविण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल आणि यासाठी आम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल.’भारताने प्रथम फलंदाजी करताना १६.३ षटकांत केवळ ८९ धावांची मजल मारली होती. याबाबत कोहलीने म्हटले की, ‘विश्रांतीनंतर जेव्हा शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे फलंदाजीला आले, तेव्हा खेळपट्टी वेगळ्या पद्धतीची बनली होती. त्यावेळी खेळपट्टी फलंदाजीसाठी फारशी योग्य नव्हती. विश्रांतीनंतर वातावरण थोडे थंड झाले होते. संध्याकाळी खेळपट्टी काहीशी वेगवान झाली होती आणि हे स्वरूप पूर्ण डावात कायम राहिले.’ (वृत्तसंस्था)कोहली म्हणाला की, ‘सामन्यातील षटकांची संख्या आणि निर्धारित लक्ष्य कमी होणे कदाचित यजमानांसाठी सोईस्कर ठरले. त्यांनी परिस्थितीकडे न पाहता, सलग फटकेबाजी केली. जर पूर्ण सामना खेळला गेला असता, तर कदाचित निकाल वेगळाही लागला असता. हा एकप्रकारे टी२० सामना झाला होता. यामध्ये फलंदाज नक्कीच गोलंदाजांपेक्षा वरचढ ठरतात आणि फलंदाज लयीत असताना त्यांना रोखणे अत्यंत कठीण असते.’यजमानांना दंडनिर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सामनाधिकारी अँडी पाइक्रोफ्ट यांनी दंड ठोठावला. आयसीसीच्या २.५.१ नियमानुसार निर्धारित वेळेत षटकांची गती न राखल्यास, खेळाडूंवर प्रत्येक षटकासाठी १०% दंड लावला जातो. त्याच वेळी कर्णधारावर हाच दंड दुप्पट होतो. यानुसार, कर्णधार एडेन मार्करम याच्यावर सामना मानधाच्या २०%, तर इतर खेळाडूंवर १०% दंड लावण्यात आला.कोहलीच्या निर्णयाने क्लासेन चकित-दक्षिण आफिकेच्या विजयात मोलाचे योगदान दिलेल्या हेन्रिक क्लासेन याला, कर्णधार विराट कोहलीच्या एका निर्णयाचे आश्चर्य वाटले. डेथ ओव्हर्सच्या निर्णायक क्षणांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या कसलेल्या वेगवान गोलंदाजांना डावलून, फिरकीपटूंना गोलंदाजी देण्यात आलेल्या निर्णयाने तो चकित झाला.फिरकीपटूंनी अंतिम क्षणी धावांची खैरात केल्याचा भारताला मोठा फटका बसला. क्लासेन म्हणाला की, ‘अंतिम क्षणांमध्ये फिरकी गोलंदाजांकडे चेंडू देण्यात आल्याचे मला आश्चर्य वाटले. डेव्हिड मिलर आणि मला वाटले की, अखेरच्या चार षटकांसाठी वेगवान गोलंदाजांना राखून ठेवले आहे.मात्र, माझ्या मते आतापर्यंतच्या कामगिरीनुसार फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली असेल, पण हा निर्णय माझ्यासाठी अनपेक्षित होता.’झेल सोडणे आणि ‘नो बॉल’मुळे मिल्लरसारखा महत्त्वाचा बळी न मिळणे हे पराभवाचे मुख्य कारण ठरले. यानंतर, सगळी लय बिघडली. याशिवाय संपूर्ण सामन्यात आम्ही चांगल्या स्थितीमध्ये होतो. पावसामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडू वळविण्यात खूप अडचणी आल्या. डेव्हिड मिल्लर खूप चांगला खेळला. त्याला नशिबाचीही साथ मिळाली. पहिले त्याचा झेल सुटला आणि त्यानंतर तो नो बॉलवर बाद झाला. साधारणपणे फिरकी गोलंदाज नो बॉल टाकत नाही. डेव्हिड मिल्लरने या जीवदानाचा पूर्ण फायदा उचलला आणि सामन्याचे चित्रच पालटले. - शिखर धवन
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दक्षिण आफ्रिकेचा विजयावर हक्क होता - विराट कोहली
दक्षिण आफ्रिकेचा विजयावर हक्क होता - विराट कोहली
पावसाच्या व्यत्ययानंतर शनिवारी रात्री उशिरा संपलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात, भारताला यजमान दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ४ गड्यांनी पराभव पत्करावा लागला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:57 PM