भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या १५ सदस्यांची नावे आजच जाहीर झाली. यंदाचा वर्ल्ड कप हा साखळी फेरीत खेळवला जाणार आहे, त्यामुळे संघांची दोन गटांत विभागणी झालेली नाही. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा तुल्यबळ होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहितनेही आज झालेल्या पत्रकार परिषदेत मान्य केले. टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी आणखी एका संघाने तगडे १५ खेळाडू निवडले आहेत. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.
या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जलदगती गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याला वर्ल्ड कप संघात निवडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने आतापर्यंत दोन वन डे सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्याच सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, हेनरिच क्लासेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन हे अनुभवी खेळाडूही संघात आहेत.
जलदगती गोलंदाजांचे नेतृत्व कागिसो रबाडा करेल आणि त्याच्यासोबतीला एनरिच नॉर्खिया व लुंगी एनगिडी दिसतील. भारतीय खेळपट्टीचा अंदाज घेत दक्षिण आफ्रिकेने केशव महाराज व तब्रेझ शम्सी या दोन अनुभवी फिरकीपटूंना संघात घेतले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत ७ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा सामना करेल. त्याआधी २९ सप्टेंबर व २ ऑक्टोबरला अनुक्रमे अफगाणिस्तान व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध सराव सामना खेळतील.
दक्षिण आफ्रिकेचा संघ - तेम्बा बवुमा ( कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, मार्के येनसन, हेनरिच क्लासेन, सिसांदा मगाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( South Africa squad: Temba Bavuma (c), Gerald Coetzee, Quinton de Kock, Reeza Hendricks, Marco Jansen, Heinrich Klaasen, Sisanda Magala, Keshav Maharaj, Aiden Markram, David Miller, Lungi Ngidi, Anrich Nortje, Kagiso Rabada, Tabraiz Shamsi, Rassie van der Dussen.)
Web Title: South Africa have announced their 15-member squad for the ICC Men's Cricket World Cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.