IND vs SA 2nd Test Live Match Updates In Marathi | केपटाउन: मालिका बरोबरीत करण्याच्या इराद्याने आज भारतीय संघ मैदानात उतरला आहे. आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिला सामना जिंकून यजमान आफ्रिकेने विजयी सलामी दिली. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्याचे आव्हान पाहुण्या टीम इंडियासमोर आहे. खरं तर मागील ३२ वर्षात भारताला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर मालिका जिंकता आलेली नाही. यंदा देखील त्याचाच प्रत्यय पाहायला मिळाला अन् यजमानांनी वर्चस्व कायम ठेवले.
आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना भारतीय संघासाठी 'करा किंवा मरा' असा आहे. सलामीच्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दुसरा सामना जिंकण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले असून, रवींद्र जडेजा आणि मुकेश कुमार यांना संधी मिळाली आहे. तर, आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांना वगळण्यात आले आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार.
दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.
भारताचा दारूण पराभवमालिकेतील सलामीच्या सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. खरं तर आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड ठोठावला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या १० टक्के दंड भरावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील दोन गुण देखील कमी झाले आहेत.