WI vs SA Test Series : दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ७ ऑगस्टपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हे दोन्हीही सामने जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३ या (WTC) स्पर्धेचे भाग आहेत. आफ्रिकेच्या संघात टेम्बा बवुमाची एन्ट्री झाली आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या संघातून त्याला वगळण्यात आले होते. तर वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनला कसोटी मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आगामी काळात आठ कसोटी सामने खेळेल. ऑक्टोबर महिन्यात आफ्रिकन संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार असून तिथे यजमानांविरूद्ध दोन सामने खेळेल. याशिवाय श्रीलंका आणि पाकिस्तानविरूद्ध आपल्या घरच्या मैदानावर आफ्रिकन संघ कसोटी सामने खेळणार आहे.
आफ्रिकेच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक Shukri Conrad यांनी सांगितले की, ट्रिस्टन स्टब्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल हे निश्चित आहे. तो अव्वल दर्जाचा खेळाडू असल्याने त्याने या क्रमांकावर खेळल्यास संघाला चांगला फायदा होईल. दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेने अपराजित राहून अंतिम फेरी गाठली. पण, प्रथमच फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या आफ्रिकेला अंतिम सामन्यात भारतीय संघाने पराभवाची धूळ चारली. आफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा दारूण पराभव करून इतिहासात प्रथमच विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता.
दक्षिण आफ्रिकेचा संघ -टेम्बा बवुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, मॅथ्यू ब्रीत्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, केशव महाराज, एडन मार्करम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, डेन पिएड, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, काइल व्हेरिनने.
WI vs SA मालिकेचे वेळापत्रक -३१ जुलै ते ३ ऑगस्ट - सराव सामना
- पहिला सामना - ७ ते ११ ऑगस्ट
- दुसरा सामना - १५ ते १९ ऑगस्ट