IND vs SA 1st ODI: कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमा (११०) आणि रॅसी वॅन डर डुसेन (१२९*) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी २९६ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने २६५ धावाच केल्या. शिखर धवन, विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर तिघांचीही अर्धशतकं व्यर्थ ठरली. भारताची मधली फळी अपयशी ठरल्याने संघाला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. याच मुद्द्यावर भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरने रोखठोक मत व्यक्त केलं.
"भारतीय फलंदाज झटपट बाद झाले. ही गोष्ट मला रुचलीच नाही. भारतीय फलंदाजी सध्याच्या घडीला खूपच भक्कम आहे. त्यामुळे अशा कामगिरीचं मला आश्चर्यच वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे याचं श्रेय दक्षिण आफ्रिकन संघ आणि कर्णधाराला द्यायला हवं. आफ्रिकन खेळाडूंना खेळाची असलेली समज खूपच चांगली होती. मार्करमला दोन षटकं टाकल्यावर थांबवतील असं मला वाटलं होतं, पण त्याला पाच षटकं टाकू दिली. आफ्रिका त्यांनी ठरवलेल्या योजनांप्रमाणे खेळले, त्यामुळेच त्यांना विजय मिळवता आला", असं संजय बांगर म्हणाला.
"केशव महाराजसारखा फिरकीपटू चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होता. कर्णधार बावुमाने त्याला गोलंदाजी करू दिली. त्याने विराटला अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याचा संघाला फायदा झाला. ऋषभ पंतला अप्रतिम पद्धतीने लेग साईडला यष्टीचीत करण्यात आलं. त्यातही गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यातील समज दिसून येते. त्याचसोबत व्यंकटेश आणि श्रेयस अय्यर दोघांनाही आखूड टप्प्याच्या गोलंदाजीने आफ्रिकेने त्रास दिला. त्यांनी त्यांचा ठरवलेला प्लॅन सोडला नाही, म्हणूनच ते जिंकले", असं कारण बांगरने दिलं.
दरम्यान, तब्बल पाच महिन्यांनी आंतरराष्ट्रीय पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनने दमदार कामगिरी केली. त्याने ८४ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. विराट कोहलीनेही ६३ चेंडूत ३ चौकार लगावत ५१ धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरने ४३ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ५० धावा केल्या.