India vs South Africa: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया T20 World Cup 2022 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. पाकिस्तानला हरवून आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला. सलग २ विजयांसह संघ ४ गुणांसह 'गट २' मध्ये अव्वल आहे. मात्र आता दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे आव्हान असणार आहे. या गटात दक्षिण आफ्रिका ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पर्थमध्ये रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून अव्वल स्थान मिळवण्यासाठी आफ्रिका मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाच्या विरुद्धच्या सामन्यापूर्वी एक खास खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या नेट्समध्ये सराव करताना पाहायला मिळाला. तो खेळाडू Mumbai Indians संघाकडून रोहितसोबतही खेळला आहे. त्यामुळे त्याला संधी दिली जाईल अशी चर्चा आहे.
ड्वेन प्रिटोरियसच्या जागी संघात मिळेल संधी
शेवटच्या टप्प्यात आफ्रिकेचा गोलंदाज ड्वेन प्रिटोरियस या दुखापतीने ग्रासला. अशा वेळी त्याच्या तोडीचा वेगवान गोलंदाज संघात घेणे आवश्यक होते. त्यामुळे त्याच्या जागी मार्को जेन्सनचा (Marco Jansen) दक्षिण आफ्रिकेच्या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला. भारत दौऱ्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात आफ्रिकेच्या प्रिटोरियसच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या जागी संघात आलेला मार्को जेन्सन संघात खेळण्याची शक्यता आहे. मार्को जेन्सन हा IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून Rohit Sharma सोबत खेळलेला आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत जरी फक्त एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळलेला असला, तरी रविवारच्या सामन्यात तो दक्षिण आफ्रिकेसाठी 'हुकूमी एक्का' ठरू शकतो.
मार्को जेन्सनने IPL 2021 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून १० सामने खेळले. मुंबईच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश होता. जसप्रीत बुमराह किंवा ट्रेंट बोल्ट यांच्यासोबत दुसऱ्या एंडने सलामीला गोलंदाजी करण्याची संधी रोहितने अनेकदा मार्कोला दिली आहे. त्याने मुंबईकडून खेळताना १० सामन्यात ९ बळी टिपले आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात रोहितसह भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्यासाठी आफ्रिका त्याचा नक्कीच वापर करेल अशी शक्यता आहे.
Web Title: South Africa to play Mumbai Indians former pacer who already played under Rohit Sharma Captaincy T20 World Cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.