RSA vs BAN Live Match Updates । न्यूयॉर्क : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांनी कमाल करताना आफ्रिकेला अवघ्या ११३ धावांत रोखले. मात्र, या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला अपयश आले. तौहीद हृदोयने एकतर्फी झुंज दिली मात्र त्याला देखील अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही. बांगलादेशकडून तौहीद हृदोय (३७) वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. अखेर बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ७ बाद १०९ धावा केल्या आणि ४ धावांनी सामना गमावला. बांगलादेशला अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या ४ चेंडूत ७ धावांची गरज असताना एक चेंडू निर्धाव गेला. मग ३ चेंडूत ७ धावा हव्या होत्या. एक धाव काढल्याने बांगलादेशला २ चेंडूत विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. पुढचा चेंडू निर्धाव गेल्याने अखेरच्या चेंडूवर बांगलादेशला एका षटकाराची गरज होती. मात्र, सामन्यातील शेवटचा चेंडू निर्धाव गेला अन् दक्षिण आफ्रिकेने पाच धावांनी विजय मिळवला. आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर कगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्खिया यांना २-२ बळी घेता आले.
फलंदाजांची 'कसोटी'!
ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या २१ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ आमनेसामने होते. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत झाली. विश्वचषकाच्या सुरुवातीपासून न्यूयॉर्कच्या या मैदानातील खेळपट्टीने गोलंदाजांना साथ दिली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी याचाच फायदा घेत ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेची 'कसोटी' केली आणि असेच काहीसे दुसऱ्या डावात बांगलादेशच्या बाबतीत झाले.
तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाला खूप संघर्ष करावा लागला. फसून येणाऱ्या चेंडूने सेट फलंदाजांना शांत ठेवले. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेन वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४४ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याच्याशिवाय डेव्हिड मिलरने ३८ चेंडूत २९ धावांची सावध खेळी केली. आफ्रिकन फलंदाजांना शांत ठेवण्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी यश मिळवले. अखेर दक्षिण आफ्रिकेने निर्धारित २० षटकांत ६ बाद ११३ धावा करून बांगलादेशला विजयासाठी ११४ धावांचे आव्हान दिले होते. बांगलादेशकडून तन्जीम हसन शाकिबने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर तस्कीन अहमद (२) आणि रिशद हुसैनला (१) बळी घेण्यात यश आले.
बांगलादेशचा संघ -नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, लिटन दास, तौहीद हृदोय, शाकिब अल हसन, झाकीर अली, महमुदुल्लाह, रिशद हुसैन, तस्कीन अहमद, तन्जीम हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.
दक्षिण आफ्रिकेचा संघ -एडन मार्करम (कर्णधार), रिझा हेंड्रिक्स, क्विंटन डीकॉक, ट्रिस्टियन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, ओटनेल बार्टमॅन.