SA vs Ind, 1st T20I Team India Beats Sout Afica By 61 Runs : संजू सॅमसन याच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजीत रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकीच्या जोरावर भारतीय संघानं डरबनचं मैदान मारलं आहे. या सामन्यातील ६१ धावांच्या दमदार विजयासह भारतीय संघाने ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २०२ धावा करत यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर २०३ धावांचं आव्हान ठेवले होते. दोनशेपारच्या या लढाईत सुरुवातीपासून शेवटपर्यंत टीम इंडियाने मॅचवर आपली पकड कायम ठेवल्याचे दिसून आले.
संजूचं विक्रमी शतक अन् टीम इंडियानं उभारला होता धावांचा डोंगर
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर २४ धावा असताना अभिषेक शर्माच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. ही विकेट गमावल्यावर कॅप्टन सूर्यकुमार यादवची मैदानात एन्ट्री झाली. संचू सॅमसन आणि सूर्यानं दमदार फलंदाजीचा नजराणा पेश करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. कॅप्टन परतल्यावर संजूनं युवा बॅटर तिलक वर्माच्या साथीनं संघाचा डाव पुढे नेला . या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली. तिलक वर्मानं १८ चेंडूत३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३३ धावांची दमदार खेळी केली. संजू समॅसननं ५० चेंडूत १०७ धावा केल्या. त्याची ही खेळी ७ चौकार आणि १० षटकाराने बहरलेली होती. या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद २०२ धावा केल्या होत्या.
अर्शदीप सिंगनं पहिल्याच षटकात घेतली विकेट, आवेश खाननंही घेतल्या २ विकेट्स
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून कुणालाच तगडी खेळी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांसमोर एकही फलंदाज ३० चा आकडा गाठू शकला नाही. हेन्रिक क्लासेनच्या भात्यातून आलेली २५ धावांची खेळी ही आफ्रिकेच्या फलंदाजांनी केलेली सर्वोच्च खेळी ठरली. भारताकडून अर्शदीप सिंगनं पहिल्याच षटकात संघाला यश मिळवून देत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलले. जलदगती गोलंदाजांमध्ये आवेश खाननंही आपल्या खात्यात २ विकेट्स घेतल्या.
फिरकीचा बोलबाला!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी आपली खास छाप सोडल्याचे पाहायला मिळाले. वरुण चक्रवर्तीनं आपल्या ४ षटकांच्या कोट्यात २५ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय रवी बिश्नोईनंही ४ षटकात २८ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ फिरकीच्या जाळ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले.