Ruturaj Gaikwad Better Than Abhishek Sharma : आयपीएलमध्ये हवा करणारा अभिषेक शर्मा टीम इंडियाकडून खेळताना मात्र सातत्यपूर्ण अपयशाचा सामना करताना पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही तो अपयशी ठरला. सातत्यपूर्ण सुरु असलेल्या त्याच्या फ्लॉप शो पाहून क्रिकेट चाहते त्याला ट्रोल करू लागले आहेत. त्याच्यापेक्षा मराठमोळा ऋतुराज गायकवाड बरा अशा प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे.
IPL मधील हिरोचा टीम इंडियाकडून फ्लॉप शो!
आयपीएलमध्ये (IPL) स्फोटक अन् धमाकेदार अंदाजानं लक्षवेधून घेणारा अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) ला टीम इंडियात एन्ट्री मिळाली. झिम्बाब्वे दौऱ्यावरील टी-२० मालिकेत त्याने शतकी खेळीसह संधीच सोनं केल. पण आता त्याच्या कामगिरीतील सातत्याचा अभावामुळे टीम इंडियात त्याचा निभाव लागणार नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे. सातत्याने टीम इंडियात संधी आणि डावाला सुरुवात करण्याची मोठी जबाबदारी त्याला देण्यात आली. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले.
अभिषेकला दुसऱ्या डावातही गाठता आला नाही दुहेरी आकडा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा ८ चेंडूचा सामना करून अवघ्या ७ धावांवर तंबूत परतला होता. दुसऱ्या सामन्यातही तो दुहेरी आकड्यापर्यंत पोहचला नाही. दुसऱ्या सामन्यात ५ चेंडूत ४ धावा करून तो बाद झाला. त्याचा हा फ्लॉप शो पाहिल्यावर सोशल मीडियावर क्रिकेट टागते त्याला ट्रोल करू लागले आहेत. काहींनी तर त्याच्यापेक्षा ऋथुराज भारी याचे दाखले दिले आहेत.
अभिषेक शर्माची मागील १० सामन्यातील कामगिरी
झिम्बाब्वे विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याच्या पदरी भोपळा पडला होता. झिम्बाव्बे दौऱ्यातील दुसऱ्या सामन्यात त्याने ४७ चेंडूत १०० धावांची खेळी केली. त्यानंतर या मालिकेतील उर्वरित २ सामन्यात त्याने १० आणि १४ अशा धावा काढल्या. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मैदानातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत प्रत्येक सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला. या मालिकेतही तो मोठी खेळी करू शकला नाही. पहिल्या दोन सामन्यात १६ आणि १५ धावा करणाऱ्या अभिषेक शर्माला तिसऱ्या सामन्यात ४ धावांवरच आउट झाला होता. आता दक्षिणआफ्रिकेविरुद्धही पहिल्या दोन सामन्यात त्याला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
त्याच्या या आकडेवारीसह ऋतुराज गायकवाडच्या मागील १० डावातील कामगिरीचा दाखला देत नेटकरी मराठमोळ्या क्रिकेटरकडून बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. ऋतुराज गायकवाडने मागील १० डावात अनुक्रमे ४०*, ०, ५८, १२३*, ३२, १०, ७, ७७*, ४९, ० अशा धावा केल्या आहेत. त्याची आकडेवारी अभिषेक शर्मापेक्षा भारी आहे.