दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी हतबल ठरल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड्यानं केलेल्या नाबाद ३९ धावांच्या जोरावर टीम इंडियानं निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १२४ धावांपर्यंत मजल मारली. बॅक टू बॅक शतकवीर संजू सॅमसनसह सलामीवीर अभिषेक शर्मा या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. सूर्यकुमार यादवलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हार्दिक पांड्याशिवायतिलक वर्मा २०(२०) आणि अक्षर पटेल २७(२१) यांनी दुहेरी आकडा गाठला. या तिघांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
या तिघांच्या भात्यातून ३ षटकार अन् ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाकडून फक्त ३ षटकार पाहायला मिळाले. यात २० चेंडूत २० धावा करणाऱ्या तिलक वर्मानं एक षटकार मारला. त्याच्याशिवाय हार्दिक पांड्यानं एक तर तळाच्या फलंदाजीतील अर्शदीपच्या भात्यातून एक उत्तुंग षटकार आला. भारतीय संघाक़डून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी मारलेल्या प्रत्येकी एक-एक चौकाराशिवाय अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांच्या बॅटमधून प्रत्येकी ४-४ चौकार पाहायला मिळाले.
दोन्ही सलामीवीरांसह कॅप्टन सूर्यकुमार यादवचा फ्लॉप शो
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर संजू सॅमसन आणि अभिषक शर्मा या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन शून्यावर बोल्ड आउट झाला. मार्को जेन्सन याने टीम इंडियाला हा पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकात जेराल्ड कोएत्झीनं अभिषेक शर्माच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. त्याने ५ चेंडूचा सामना केल्यावर एक चौकार मारून भारताचा दुसरा सलामीवीर तंबूत परतला. पहिली जोडी स्वस्तात माघारी फिरल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडून मोठ्या आणि आश्वासक खेळीची अपेक्षा होती. पण तोही ९ चेंडूचा सामना करून ४ धावांवर बाद झाला.
तिलक वर्मानं अप्रतिम झेलवर तर अक्षर पटेलनं रन आउटच्या रुपात गमावली विकेट
मध्यफळीतील फलंदाज तिलक वर्मानं २० चेंडूत २० धावा करत मैदानात तग धरला. पण मार्करमच्या गोलंदाजीवर डेविड मिलरन सर्वोत्तम झेल टिपत या युवा बॅटरचा खेळ खल्लास केला. अक्षर पटेलनं हार्दिक पांड्यासोबत टीम इंडियाचा डाव पुढे नेला. ही जोडी चांगलीच जमली होती. पण रन आउटच्या रुपात अक्षर पटेल बाद झाला अन् टीम इंडियाची धावगती आणखी मंदावली. त्याने २१ चेंडूत २७ धावा केल्या. रिंकू सिंग ११ चेंडूत ९ धावा करून परतला. हार्दिक पांड्याने ४५ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केलेल्या नाबाद ३९ धावा आणि अर्शदीपनं ६ चेंडूत केलेल्या नाबाद ७ धावांच्या खेळीच्या रुपात टीम इंडियानं निर्धारित २० षटकात ६ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली.