South Africa vs India, 4th T20I : जोहान्सबर्गच्या द वाँडरर्स स्टेडियमवर रंगलेल्या चौथ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय सलामी जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. सलग दोन शतकानंतर मागील दोन सामन्यात भोपळा पदरी पडलेल्या संजू सॅमसन याने या सामन्यात एकेरी धावेनं आपलं खात उघडलं. दुसऱ्या बाजूला तिसऱ्या टी-२० सामन्यातील अर्धशतकवीर अभिषेक शर्मानं जीवनदान मिळालेल्या चेंडूवर खाते उघडले. पण काही वेळातच दोघांनी आपले तेवर बदलले.
भारताच्या सलामी जोडीनं २५ चेंडूत धावफलकावर लावल्या ५० धावा, पण...
संजू सॅमसन याने भारतीय संघाच्या डावातील पहिला षटकार मारला. त्यानंतर अभिषेक शर्मानंही त्याची पार्टी जॉइन केली. पहिल्या षटकात फक्त ४ धावा काढणाऱ्या या सलामी जोडीनं पाचव्या षटकात संघाचं अर्धशतक पूर्ण केले. अभिषेक शर्मानं षटकार मारून संघाची धावफलकावर ५० धावा लावल्या. ही जोडी चांगलीच जमली होती. पॉवर प्लेमध्ये दोघांनी आपल्या बॅटिंगमधील पॉवरही दाखवली. पण पॉवर प्लेमध्येच ही जोडी फुटली.
अभिषेकनं छोट्याखानी खेळीत दाखवला स्फोटक अंदाज
पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्माच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. लुथो सिपामला याच्या गोलंदाजीवर अभिषेक कॅच आउट झाला. १८ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ३६ धावा केल्या. पहिल्या विकेसाठी सलामी जोडीनं ३५ चेंडूत ७३ धावांची दमदार भागीदारी केली.