T20 World Cup, South Africa vs Netherlands : नेदरलँड्स संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अखेरच्या लढतीत धक्कादायक निकाल नोंदवला. नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेला १३ धावांनी धूळ चारली आणि या पराभवासह आफ्रिकेचं स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आलं आहे. नेदरलँड्सच्या १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकेच्या संघाला २० षटकांच्या अखेरीस ८ गडी गमावून १४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. नेदरलँड्सनं १३ धावांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
गुणतालिकेत द.आफ्रिकेचा संघ पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी होता. त्यामुळे या विजयासह आफ्रिकेला सेमीफायनलसाठी क्वालिफाय करण्याची संधी होती. पण आता आफ्रिकेच्या संघाला ५ गुणांवरच समाधान मानावं लागणार आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश संघ प्रत्येकी ४ गुणांवर आहेत. त्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात विजयी संघ ६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचेल हे निश्चित झालं आहे.
महत्वाच्या सामन्यात सपशेल नांगी टाकण्याचा कित्ता द.आफ्रिकेच्या संघानं पु्न्हा एकदा गिरवला आणि आता संघाला सेमीफायनलच्या उंबरठ्यावरुनच माघारी परतावं लागलं आहे. नेदरलँड्सच्या या विजयामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या संघाला संजीवनी मिळाली आहे.
प्रथम फलंदाजीला उतरताना नेदरलँड्सने ४ बाद १५८ धावा केल्या. स्टीफन मायबर्ग ( ३७), मॅक्स ओ'डाऊड ( २९) यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर टॉम कूपर ( ३५) व कॉलिन एकरमन ( ४१*) यांनी फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला पार करून दिला. केशव महाराजने दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिका हे लक्ष्य सहज पार करतील असेच वाटत होते. पण, नेदरलँड्सने कमाल करून दाखवली.
क्विंटन डी कॉक ( १३) व टेम्बा बवुमा ( २०) सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरले आणि त्यानंतर आफ्रिकेची गाडी घसरत गेली. रिली रोसोवू ( २५), एडन मार्कराम ( १७) व डेव्हिड मिलर ( १७) यांना हेही अपयशी ठरले. त्यानंतर विजयासाठी आवश्यक धावांची सरासरी वाढल्यामुळे दबावात द.आफ्रिकेचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. अखेरच्या आफ्रिकेला ८ बाद १४५ धावाच करता आल्या.
Web Title: South Africa vs Netherlands highlights T20 World Cup Super 12 Group 2 Netherlands stun South Africa India enter semis
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.