पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) यांच्यातील रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानने विजय प्राप्त केला असला तरी दक्षिण आफ्रिकेच्या एका गोलंदाजानं सर्वाचं मन जिंकलं आहे. (George Linde injury in South Africa vs Pakistan Test)
आफ्रिकेच्या जॉर्ज लिंडे (George Linde) या फिरकीपटूनं बोटाला गंभीर दुखापत झालेली असतानाही गोलंदाजी केली. इतकंच नव्हे, तर संघ कठीण परिस्थितीत असताना त्यानं दुखापतीचं कारण न देता फलंदाजी देखील केली. पाकिस्तानच्या पहिल्या डावात जॉर्जला दुखापतीमुळे केवळ ५.५ षटकंच गोलंदाजी करता आली. जॉर्जच्या बोटाला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की त्याचा नॅपकीन रक्तानं माखला होता आणि बोटाचं हाडही स्पष्टपणे दिसू लागलं होतं. पण जॉर्जनं अशा परिस्थितीतही दाखवलेल्या लढवय्या वृत्तीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?पाकिस्तानचा डाव सुरू असताना २३ व्या षटकात बाबर आझमने लगावलेल्या स्ट्रेट ड्राइव्हला रोखण्याचा जॉर्ज लिंडेने प्रयत्न केला. पण चेंडू जॉर्जच्या बोटाला लागून निघून गेला. बोटाला जबर दुखापत झाली. रक्त वाहू लागलं. वेदनेनं कळवळत तसाच जॉर्ज मैदानाबाहेर गेला. जॉर्जच्या बोटाचा तातडीनं एक्स रे करण्यात आला. सुदैवानं जॉर्जच्या बोटाचं हाड तुटलं नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर लिंडे पुन्हा मैदानात गोलंदाजी करण्यासाठी परतला. जॉर्जच्या बोटाला टाके लागलेले असताना देखील तो दुसऱ्या दिवशी नेट्समध्ये सराव करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी देखील जॉर्जने दोन षटकं टाकली. त्यानंतर २१ चेंडूत २१ धावा देखील केल्या. पुढच्या डावात जॉर्जने पुन्हा ९ षटकं टाकली यात त्यानं केवळ १२ धावा देऊन ३ विकेट्स देखील घेतल्या.
"मी पाहिलं होतं माझ्या हाताला जेव्हा दुखापत झाली तेव्हा हाड बाहेर आलं होतं. पण एक्सरे केल्यानंतर हाड तुटलं नसल्याचं कळालं आणि बरं वाटलं. तुम्हाला तुमच्या देशासाठी पुन्हा खेळण्याची केव्हा संधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे दुखापत तुम्हाला कमजोर करू शकत नाही. नक्कीच मला वेदना होत होती. पण मी लढत होतो कारण मी माझ्या देशासाठी खेळत होतो", असं जॉर्ज लिंडे म्हणाला.