South Africa vs Sri Lanka 1st Test : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकन संघाची डरबन कसोटी सामन्यात बिकट अवस्था झाल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४९.४ षटकात १९१ धावांवर आटोपल्यावर श्रीलंकेचा संघ फलंदाजीला उतरला. पण अवघ्या १३. ५ षटकात ४२ धावांत लंकेच्या संघाचा पहिला डाव खल्लास झाला. या कामगिरीसह श्रीलंकेच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालीये. कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील त्यांची ही निच्चांकी धावसंख्या आहे. याआधी १९ृ९४ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकाचा डाव ७१ धावांत आटोपला होता.
डरबनच्या मैदानात गोलंदाजांचा कहर, ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
डरबन कसोटी सामन्यात गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी ६४ ओव्हर्समध्ये २० विकेट्स गमावल्या. यातील १८ विकेट्स या जलगती गोलंदाजांनी तर २ विकेट्स या श्रीलंकन फिरकीपटूने घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४९.५ षटके खेळली. तर श्रीलंकेच्या संघानं १३.५ षटके फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून मार्को यान्सेन याने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. कगिसो रबाडाच १ आणि गेराल्ड कोएत्झीनं २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. श्रीलंकेच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज आसिथा फर्नांडो आणि लहिरू कुमारा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. विश्वा फर्नांडो २ आणि फिरकीपटू प्रभात जयसूर्याच्या खात्यात २ विकेट्स जमा झाल्या.
श्रीलंकेच्या फक्त दोघांनी गाठला दुहेरी आकडा
श्रीलंकेकडून मामिंदू मेंडिस याने सर्वाधिक १३ धावा केल्या. त्याच्याशिवाय लाहिरु कुमारानं नाबाद १० धावांची खेळी केली. या दोघांशिवाय अन्य कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. लंकेच्या ताफ्यातील पाच फलंदाजांना तर खातेही उघडता आले नाही. यात दिनेश चंडीमल, कुसल मेंडिस, प्रभात जयसूर्या,विश्वा फर्नांडो आणि आसिथा फर्नांडो यांचा समावेश आहे.