सेंच्युरियन पार्क - मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीसह मुरली विजय आणि लोकेश राहुल तंबूत परतल्याने दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसअखेर ३ बाद ३५ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताला विजयासाठी अद्याप २५२ धावांची गरज असून, सात गडी भारतीय संघाच्या हाती आहेत.
कठीण खेळपट्टीवर मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीवीर मुरली विजय (९), लोकेश राहुल (४) हे झटपट बाद झाले. भारतीय संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीसुद्धा ५ धावा काढून माघारी परतला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा (११) आणि पार्थिव पटेल (५) धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी सेंच्युरियन कसोटीच्या चौथ्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेने डीव्हिलियर्स (८०), डीन एल्गर (६१) आणि फाफ डू प्लेसी (४८) यांनी केलेल्या संयमी खेळाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सर्वबाद २५७ धावा फटकावल्या. भारताकडून मोहम्मद शमीने चार, बुमराने तीन, इशांत शर्माने दोन आणि अश्विनने एक गडी बाद केला. मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघासमोर दुसऱ्या कसोटीत विजयासाठी २८७ धावांचे आव्हान ठेवले होते.
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर डिव्हिलियर्स आणि डीन एल्गरने सुरुवातीला समर्थपणे भारतीय गोलंदाजीचा सामना करत धावफलक हलता ठेवला. एल्गर आणि डिव्हिलियर्सची जोडी फोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. काल दुस-या डावाला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभीच दक्षिण आफ्रिकेला दोन धक्के बसले त्यावेळी भारत दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व मिळवेल असे वाटत होते पण डिव्हिलियर्स आणि एल्गरने भारतीय गोलंदाजी समर्थपणे खेळून काढत दडपण दूर केले. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली. पण डिव्हिलियर्स 80 धावांवर मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर एल्गरही ६१ धावांवर माघारी परतला. नंतर मात्र शमी, बुमरा आणि इशांतने दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कापून काढली.