ICC Men's Cricket World Cup - दक्षिण आफ्रिकेला वन डे वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. प्रमुख गोलंदाज एनरिच नॉर्खिया ( Anrich Nortje) आणि सिसांडा मगाला ( Sisanda Magala) यांना फिटनेस टेस्ट पास करता आली नाही. आफ्रिकेने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय वर्ल्ड कप संघात नॉर्खियाचा समावेश होता. नॉर्खिया आणि मगाला हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही खेळले नव्हते.
नॉर्खियाला यापूर्वी २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंगठा फ्रॅक्चर झाल्याने स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. नॉर्खियाकडे भारतीय वातावरणात खेळण्याचा चांगला अनुभव आहे आणि त्या २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो आफ्रिकेसाठी हुकूमी एक्का ठरला असता. नॉर्खियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर पहिल्या वन डेत खेळता आले नव्हते. तो दुसऱ्या वन डेत संगात परतला, परंतु ५ षटकं टाकून बाहेर गेला. त्यानंतर त्याला माघार घ्यावी लागली.
अँडील फेहलुकवायो आणि लिझाड विलियम्स यांची आफ्रिकेच्या संघात एन्ट्री झाली आहे. फेहलुकवायो हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन वन डे सामने खेळला होता आणि २ विकेट्स घेतल्या. त्याने निर्णायक पाचव्या वन डे सामन्यात १९ चेंडूंत ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती आणि त्यात २ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. आफ्रिकेच्या वर्ल्ड कप संघात कागिसो रबाडा, मार्को येन्सन, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी हे जलदगती गोलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ २३ सप्टेंबरला भारतात दाखल होईल आणि ७ ऑक्टोबरला त्यांचा पहिला मुकाबला श्रीलंकेविरुद्ध आहे.