नवी दिल्ली : गोलंदाजांकडून झालेल्या सुमार माऱ्यामुळे द्विशतकी मजल मारल्यानंतरही भारताला पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर ४ बाद २११ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य १९.१ षटकांत केवळ ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
हा सामना जिंकून भारताला सलग १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम रचण्याची संधी होती. मात्र, डेव्हिड मिलर आणि भारताला कायम नडणारा रसी वॅन डेर डुसेन यांनी भारताला या विक्रमापासून दूर ठेवले. मिलरने ३१ चेंडूंत नाबाद ६४ धावांचा तडाखा देताना ४ चौकार व ५ षटकार मारले. डुसेनने ४६ चेंडूंत नाबाद ७५ धावा काढताना ७ चौकार व ५ षटकार मारले. दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद १३१ धावांची निर्णायक भागीदारी केली. आयपीएलमधील तुफानी फॉर्म कायम राखलेल्या मिलरने भारताच्या हातातून सामना खेचून आणला.
भारताचे आक्रमण
त्याआधी, इशान किशन आणि हार्दिक पांड्याच्या जोरावर भारताने आव्हानात्मक मजल मारली. ऋतुराज गायकवाडने इशानसह ३८ चेंडूंत ५७ धावांची सलामी दिली. ऋतुराज बाद झाल्यानंतर इशानने श्रेयस अय्यरसोबत दुसऱ्या गड्यासाठी ४० चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. इशानने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली.
आफ्रिकेवर हल्ला चढवला तो हार्दिक पांड्याने. त्याने १२ चेंडूंत नाबाद ३१ धावा कुटताना २ चौकार व ३ षटकार मारताना भारताला दोनशेपलीकडे नेले.
निर्णायक क्षण
१६व्या षटकात आवेश खानच्या दुसऱ्याच चेंडूवर श्रेयसने डुसेनचा सोपा झेल सोडला. यावेळी डुसेन २९ धावांवर खेळत होता. या जीवदानाचा फायदा घेत डुसेनने निर्णायक
खेळी केली.
Web Title: South Africa won by 7 wickets, Miller-Dussen shined; India's world record victory was briefly missed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.