डर्बन, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका : दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने गुरुवारी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने श्रीलंका विरुद्धच्या कसोटी सामन्यात 4 विकेट घेत भारताचे महान कर्णधार व जलदगती गोलंदाज कपिल देव यांचा विक्रम मोडला. स्टेनच्या या कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेने पाहुण्या श्रीलंकेचा पहिला डाव 191 धावांत गुंडाळला. आफ्रिकेने पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात त्यांनी 4 बाद 126 धावा करताना 170 धावांची आघाडी घेतली आहे.
हा कसोटी सामना सुरू होण्यापुर्वी स्टेनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 433 विकेट्स होत्या आणि त्याला कपिल देव यांच्या ( 434 विकेट्स) विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी एका विकेटची गरज होती. स्टेनने पहिल्या डावात 20 षटकांत 48 धावा देत 4 विकेट घेतल्या आणि कपिल देव यांचा विक्रम मोडला. यासह त्याच्या खात्यात 437 विकेट्स झाल्या आहेत आणि त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडशी ( 437 विकेट्स) बरोबरी केली आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टेनने ब्रॉडसह संयुक्तपणे सातवे स्थान पटकावले आहे. कपिल देव यांनी 434 विकेट्ससाठी 131 कसोटी खेळल्या, तर स्टेनने 92 कसोटीत 437 विकेट्स घेतल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन ( 800 ) आघाडीवर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न ( 708), भारताचा अनिल कुंबळे ( 619), इंग्लंडचा जेम्स अँडरसन ( 575), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्राथ ( 563 ) आणि वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श ( 519 ) यांचा क्रमांक येतो. त्यानंतर डेल स्टेन ( 437 ), स्टुअर्ट ब्रॉड ( 437 ), कपिल देव ( 434 ) , रंगना हेराथ ( 433 ) आणि सर रिचर्ड हैडली ( 431) यांनी अव्वल दहामध्ये स्थान पटकावले आहे.
या विक्रमानंतर स्टेन म्हणाला,''दुखापतीमुळे दोन वर्ष क्रिकेटपासून दूरावलो होतो. त्यानंतर कमबॅक करणे म्हणजे मला मिळालेले वरदानच म्हणावे लागेल. मला पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागली.''
Web Title: South African bowler Dale Steyn breaks legendary Kapil Dev's 434 wicket's record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.