नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेची महिला फलंदाज मिग्नॉन डू प्रीझने (Mignon Du Preez) गुरुवारी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. 32 वर्षीय डू प्रीझने दक्षिण आफ्रिकेसाठी 154 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ती 2014 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातही सहभागी झाली होती. महत्वाचे म्हणजे, डु प्रीझने नुकतेच भारतीय संघाला महिला विश्व चषकातून (Women’s World Cup-2022) बाहेरचा रस्ता दाखविण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती.
खरे तर, डु प्रीझने टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने आणि कुटुंबीयांसोबत अधिक वेळ घालविण्याच्या उद्देशाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
यामुळे घेतली निवृत्ती -
डु प्रीझ म्हणाली, 'मला आतापर्यंत चार आयसीसी एकदिवसीय विश्वचषकांत खेळण्याचा बहुमान मिळाला. या माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आठवणी आहेत. पण आता मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडेल आणि आशा आहे की मी लवकरच माझा संसारही सुरू करेल. मला वाटते की खेळाच्या दीर्घ फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची आणि टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे. यामुळे न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेला विश्वचषक पूर्ण झाल्यानंतर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
2007 पासून खेळते क्रिकेट -
मधल्या फळीतील फलंदाज डु प्रीझने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तीने एकूण 154 एकदिवसीय सामने खेळले आहे. तर यांपैकी ती 46 सामन्यांत दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधारही होती. तिने 2016 मध्ये आयर्लंडविरुद्ध नाबाद 116 धावा ठोकल्या होत्या. ही तिची सर्वोच्च धावसंख्या होती. तिने 18 अर्धशतके आणि दोन शतकांसह 32.98 च्या सरासरीने 3,760 धावा केल्या आहेत.
Web Title: South African cricketer mignon du preez announced retirement from ODI and test cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.