साउथॅम्प्टन : सध्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील शेवटचा सामना इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथे खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यजमान संघाला धूळ चारून सामन्यासह मालिकेवर देखील कब्जा केला. ९० धावांनी झालेल्या मोठ्या पराभवामुळे इंग्लिश संघाने १-२ ने मालिका गमावली. सामन्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला मात्र सर्वात जास्त चर्चा रंगली ती ट्रिस्टन स्टब्सच्या फिल्डिंगची. कारण स्टब्सने एका हाताने पकडलेला झेल आता सर्वत्र व्हायरल होत आहे. स्टब्जने मालिकेतील पहिल्याच सामन्यात २५७ च्या स्ट्राईक रेटने ७२ धावांची आक्रमक खेळी केली होती.
दरम्यान, ट्रिस्टन स्टब्स हा इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL)मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग राहिला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या आर्मीतील खेळाडूची खूप चर्चा रंगली आहे. स्टब्जने सामन्याच्या १० व्या षटकात हा अप्रतिम झेल पकडून सर्वांचे लक्ष वेधले. त्याने फिरकीपटू ॲडन मार्करमच्या षटकामध्ये हवेत उडून सुपरमॅन पद्धतीने झेल पकडून इंग्लंडचा फलंदाज मोईन अलीला तंबूत पाठवले. मोईन अली मोठा फटकार मारण्याच्या तयारीत होता मात्र चेंडू स्टब्सच्या दिशेने गेला आणि स्टब्सने अशक्याचे शक्य करून अलीला बाद केले.
एकाच हाताने पकडला झेललक्षणीय बाब म्हणजे आपण बाद झालोय यावर मोईन अलीचा विश्वास देखील बसत नव्हता. स्टब्सने अप्रतिम झेल घेऊन सर्वांनाच चकीत केले. स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना देखील स्टब्जच्या या सुपरमॅन अवतारावर विश्वास बसत नव्हता. मोईल अली बाद होताच इंग्लंडला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसू लागले आणि आफ्रिकेने दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना इंग्लिश संघ १६.४ षटकांमध्ये केवळ १०१ धावांवर सर्वबाद झाला. आफ्रिकेने आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर ९० धावांनी तिसरा सामना जिंकला आणि मालिकेवरही कब्जा केला.