मुंबई - एकीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणा-या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत जबरदस्ती कामगिरी केली असताना, मिताली राजच्या नेतृत्वात महिला संघानेही दक्षिण आफ्रिकेची दमछाक केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय मालिकेत धूळ चारल्यानंतर टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही हरवलं आहे. पण या सगळ्यात दक्षिण आफ्रिकेची महिला खेळाडू क्लोई ट्रायोन हिने एक अशी कामगिरी केली आहे, जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप एकही पुरुष खेळाडू करु शकलेला नाही.
आकडेवारीबद्दल बोलायचं झाल्यास मंगळवारी भारताविरोधातील पहिल्या टी-20 सामन्यात क्लोई ट्रायोनने असं काही केलं आहे ज्यासाठी तिला नेहमी लक्षात ठेवलं जाईल. क्रिकेटमधील कोणत्याही महान खेळाडूचं नाव घ्या मग ते डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग किंवा मग आजचे विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स कोणीही असो. क्लोई ट्रायोनने या सर्वांना मागे पाडलं आहे. मात्र तरीही क्लोई ट्रायोन आपल्या संघाला सामना जिंकवून देऊ शकली नाही.
असा कोणता रेकॉर्ड क्लोई ट्रायोनने केला आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. क्लोई ट्रायोनने या सामन्यात फक्त 7 चेंडूत 32 धावांची खेळी केली. सहा मिनिटांच्या आपल्या खेळीत क्लोई ट्रायोनने 4 षटकार आणि 2 चौकार ठोकले. फक्त एका चेंडूवर क्लोई ट्रायोन एकही धाव करु शकली नाही. या सामन्यात क्लोई ट्रायोनचा स्ट्राइक रेट 457.14 होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमधील स्ट्राइक रेटबद्दल बोलायचं झाल्यास हा आतापर्यंत सर्वोच्च आहे.
14 फेब्रुवारी 2018 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 4064 पुरुष खेळाडू खेळले आहेत. पण अद्यापही एकही पुरुष खेळाडू या स्ट्राइक रेटने धावा करु शकलेला नाही. वेस्ट इंडिजच्या स्मिथने 2007 मध्ये बांगलादेशविरोधातील टी-20 सामन्यात 9 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 414.28 होता. पण क्लोई ट्रायोनने त्यालाही मागं टाकलं आहे.