बेनोनी : उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघ १९ वर्षांखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मंगळवारी यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाच्या निर्धारासह उतरणार आहे. गतविजेत्या भारताने सलग पाच विजयांसह उपांत्य फेरीत धडक दिली. अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सर्वच सामन्यांवर भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजविले. विशेष खेळाडूवर विसंबून न राहता गरजेनुसार सांघिक खेळीवर भारताचा भर राहिला. फलंदाजांनी खोऱ्याने धावा केल्या तर गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांना गुंडाळून मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला.
दोन शतके आणि एका अर्धशतकी खेळीसह १८ वर्षांचा मुशीर खान स्पर्धेत सर्वांत यशस्वी फलंदाज ठरला आहे. ५ सामन्यात ८३.५०च्या सरासरीने त्याने ३३४ धावा ठोकल्या. कर्णधार इदय सहारनने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ६१.६०च्या सरासरीने ३०४ धावांचे योगदान दिले. सचिन धस याने नेपाळविरुद्ध ११६ धावांची खेळी करीत संघाला संकटाबाहेर काढले होते. उपकर्णधार आणि फिरकी गोलंदाज स्वामी कुमार पांडे याने १६ बळी घेतले असून नमन तिवारीने ९ आणि राज लिम्बानी याने ४ बळी घेतले आहेत. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत द्यावी लागेल. विश्वचषकाआधीच्या तिरंगी मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेला दोनदा हरविले होते. पण बादफेरीच्या सामन्यात वेगळे दडपण असते. त्यामुळे पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय फलंदाज वि. प्रतिस्पर्धी वेगवान गोलंदाज क्वेना मफाका अशी चुरस पाहायला मिळू शकते. मफाकाने स्पर्धेत १८ गडी बाद केले आहेत.
सामना दुपारी १.३० पासून, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, लाइव्ह स्ट्रिमिंग : डिझ्नी हॉटस्टार