- सौरभ गांगुली लिहितात...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमाविल्यानंतर भारतीय संघाने वन-डे मालिकेत एकहाती वर्चस्व गाजवले. भारताने मालिकेत ५-१ ने विजय मिळवला. त्यात कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी बघून आनंद झाला. उभय संघांदरम्यान कोहलीची फलंदाजी हा महत्त्वाचा फरक होता.
भारतीय संघाने वन-डेमध्ये सर्वोत्तम असल्याचे सिद्ध केले असून आगामी तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतही टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेल. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौरा उंचावलेल्या मनोधैर्यासह संपवण्याची शक्यता आहे. टी-२० क्रिकेटमध्ये उभय संघांदरम्यानची दरी कमी होते, पण भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता मालिका चुरशीची होण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आपल्या खेळाचा दर्जा उंचावावा लागेल.
मालिकेचे महत्त्व बघता दक्षिण आफ्रिकेसाठी संघनिवड माझ्या आकलनापल्याड आहे. भारतीय संघाचा दौरा हा कुठल्याही देशासाठी स्पेशल असतो. दक्षिण आफ्रिकेने मात्र काही खेळाडूंना वगळल्यामुळे मला आश्चर्य वाटले. अखेरच्या वन-डेमध्ये डेव्हिड मिलरला वगळणे आश्चर्यचकित करणारे होते. त्याचप्रमाणे टी-२० मालिकेत रबाडाचा समावेश नाही, ही आश्चर्याची बाब आहे. जेपी ड्युमिनी टी-२० संघाचे नेतृत्व करीत आहे, पण अखेरच्या वन-डेमध्ये त्याचा समावेश नव्हता. पोर्ट एलिझाबेथमध्ये चांगला मारा करणाºया शम्सीच्या स्थानी अखेरच्या वन-डेमध्ये इम्रान ताहिरला स्थान देण्यात आले. पराभूत होत असताना संघात बदल करण्यात येतात, पण दक्षिण आफ्रिकेने केलेले बदल पचनी पडणारे नाहीत.
एबी डिव्हिलियर्सचा खराब फॉर्म दक्षिण आफ्रिका संघासाठी चिंतेची बाब ठरली. पुनरागमन करणे सोपे नसते, याची सर्वांना कल्पना आहे आणि भारतीय गोलंदाजांनी सातत्याने त्याच्यावर दडपण निर्माण केले आहे. कोहलीने संघाची जबाबदारी कशी स्वीकारली, हे डिव्हिलियर्सने बघायला हवे. दक्षिण आफ्रिका संघासाठी पुन्हा एकदा ७ ते १४ ही आठ षटके आव्हान ठरणार आहे. पहिली लढत वाँडरर्सवर होणार असून सामना लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे वन-डेमध्ये दवामुळे चेंडू ओलसर होण्याचा जो भारतीय संघाला त्रास झाला तो मुद्दा येथे निकाली निघाला आहे.
भारतीय संघासाठी सुरेश रैना संघात परतला आहे. त्याला आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची ही
चांगली संधी आहे. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताची मधली फळी अद्याप स्थिरावलेली नाही. त्यामुळे
टी-२० मध्ये चांगली कामगिरी केली तर रैनाला वन-डे संघात स्थान मिळवता येईल. रैना चांगला क्षेत्ररक्षक आहे. (गेमप्लान)
Web Title: South Africa's team selection is not understandable
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.