माऊंट मोंगानुई : दक्षिण आफ्रिकेने अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सोमवारी गत विजेत्या इंग्लंडचा तीन गडी राखून पराभव करीत आयसीसी महिला वन डे विश्वचषकात विजयी हॅटट्रिक साधली.
मेरिजाने काप हिच्या ४५ धावातील पाच बळींच्या बळावर आफ्रिकेने इंग्लंडला ९ बाद २३५ असे रोखले. टॉमी ब्युमोंटने ६२ आणि यष्टिरक्षक एमी जोन्सच्या ५३ धावा प्रमुख ठरल्या. यानंतर लॉरा वोलवॉर्टच्या आठ चौकारांसह १०१ चेंडूत ७७ धावांच्या खेळीमुळे चार चेंडू आधीच विजय साकार केला. कर्णधार सुने लुस ३६, कापने ४२ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह ३२ आणि ताजमीन ब्रीट्सने २३ धावांचे योगदान दिले.
विजयासाठी दहा धावांची गरज असताना आन्या श्रबसोलच्या चेंडूवर काप पायचित झाली. यामुळे इंग्लंड संघाची आशा पल्लवित झाल्या होती तोच तृषा चेट्टी नाबाद १२ आणि शबनीम इस्माईल नाबाद पाच यांनी दक्षिण आफ्रिकेला लक्ष्य गाठून दिले. द. आफ्रिका संघ गुण तालिकेत भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा सलग तिसरा पराभव झाल्याने त्यांना खाते उघडता आलेले नाही. सन २००० नंतर दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात इंग्लंडवर हा पहिलाच विजय ठरला.