नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सध्या चर्चेत आहे. धोनीने मुंबईत मर्सिडीज बेंझ EQB इंडिया न्यू कारच्या लॉन्चिंगच्या वेळी एक विधान केले आणि सर्वांचे लक्ष वेधले. खरं तर धोनीच्या उपस्थितीत ही लक्झरी कार लॉन्च करण्यात आली. त्याने गाडीने येत अनोख्या शैलीत स्टेजवर एन्ट्री केली. यावेळी त्याने मंचावर उपस्थितांना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, यातीलच एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने तरूणाईला मोलाचा सल्ला दिला.
सध्या धोनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्याच्यामध्ये तो लॉन्चिंगच्या वेळी विविध प्रश्नांची उत्तरे देत आहे. यादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने गुंतवणुकीबाबत सल्ला दिला. पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कुटुंबाची देखील काळजी घेतली पाहिजे असे धोनीने म्हटले. व्हिडीओमध्ये धोनी म्हणतो की, "जेव्हा तुम्ही कमावायला लागाल तेव्हा ते पैसे आधी तुमच्या पालकांना द्या."
धोनीने तरूणाईला दिले गुंतवणुकीचे धडेमहेंद्रसिंग धोनी व्हिडीओमध्ये स्पष्टपणे सांगत आहे की, माझ्याकडे याआधी देखील अनेक गाड्या आहेत, त्यामुळे मी या प्रश्नाचे नीट उत्तर देऊ शकत नाही, पण मी माझी पहिली लक्झरी कार घेतली याचा मला आनंद आहे. जेव्हा तुम्ही कमावायला लागाल तेव्हा आधी ते पैसे तुमच्या पालकांना द्या. मग पुढचा विचार करा. पालकांना पगार देणे कधीच बंद करू नये, पण हो गुंतवणूक करायची असेल तर प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा. मालमत्तेसोबतच तुम्ही अधिक पैसे कमवण्यासाठी शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करू शकता." अशा शब्दांत धोनीने तरूणाईला गुंतवणुकीचे धडे दिले.
धोनी पुन्हा सांभाळणार कर्णधारपदाची धुरा धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने 4वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. तर 2 वर्ष धोनीच्या संघाला बॅनमुळे बाहेर व्हावे लागले होते. सीएसकेने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये विजेतेपद पटकावले. मागील हंगामात धोनीने जडेजाकडे कर्णधारपद सोपवले असले तरी जडेजासह संपूर्ण संघाच्या फ्लॉप कामगिरीनंतर धोनी पुन्हा एकदा कर्णधारपद स्वीकारण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनी आगामी आयपीएल हंगामात सीएसकेच्या संघाची धुरा सांभाळणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"