अयाज मेमनकन्सल्टिंग एडिटर
टी-२० विश्वचषक जिंकून परतलेल्या टीम इंडियाचा विजयी जल्लोष मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर ज्यांनी पाहिला त्यांची छाती गर्वाने फुलून गेली. लाडक्या खेळाडूंच्या स्वागतासाठी उसळलेला जनसागर क्रिकेट भारतीयांच्या नसानसांत किती भिनले आहे, याची साक्ष देत होता. आम्ही ११ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. टीम इंडिया अनेकदा ट्रॉफीच्या जवळपास पोहोचूनदेखील २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदानंतर चषक उंचावू शकला नव्हता. मागच्यावर्षीच्या रेकॉर्डवर नजर टाकल्यास भारत डब्ल्यूटीसी फायनल आणि वनडे विश्वचषकाच्या फायनलमध्ये हरला. चाहत्यांची घोर निराशा झाली होती. मोक्याच्या क्षणी येणारे मानसिक दडपण भारतीय संघ झुगारू शकला नव्हता. जेतेपदाच्या सततच्या हुलकावणीमुळे दक्षिण आफ्रिकेसारखाच भारतावर ‘चोकर्स’चा ठप्पा लागला. हा ठपका आणखी गडद होत होता.
कर्णधार, प्रशिक्षक, निवडकर्त्यांची भूमिका निर्णायक
भारत टी-२० विश्वविजेता कसा बनला? मैदानावर योग्य निर्णय घेणारा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य रणनीतिकार असलेले मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचे जेतेपदात मोलाचे योगदान राहिले. रोहितने मैदानावर चपखल निर्णय घेतले. स्पर्धेदरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप तसेच फिरकीपटू कुलदीप आणि अक्षर पटेल यांचा योग्य वापर केला. फायनलमध्ये हार्दिक पांड्याचा शिताफीने वापर करण्याची रोहितची कृती अप्रतिम ठरली.
चॅम्पियन बनलो, पुढे काय?
आता प्रश्न असा की, पुढे काय? राहुल द्रविड प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० तून निवृत्ती घेतली. अर्थात, आता संघाला नवा प्रशिक्षक मिळेल. हार्दिकसारखा नवा कर्णधारदेखील टी-२० प्रकारात मिळू शकतो. क्रिकेट आता कसोटी आणि वनडे सोबतच टी-२० प्रकारांत विभागले गेले. कसोटी तसेच वनडेत वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया ‘दादा’ संघ मानले जायचे. क्लाइव्ह लॉइड यांच्या नेतृत्वात विंडीजने नेहमी वर्चस्व गाजविले. दोन्ही प्रकारांत हा संघ विजेता होता. नंतर ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाने ॲलन बॉर्डरच्या नेतृत्वात १९८७चा वनडे विश्वचषक जिंकला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडले. कसोटी-वनडे या प्रकारात या संघाने वर्चस्व कायम केले.
विजयाची भूक वाढीस लागते
जे मोठे संघ असतात त्यांचे वैशिष्ट्य असे की, ते एका विजयावर समाधानी होत नाहीत. त्यांच्यात विजयाची भूक वाढतच जाते. कर्णधाराचा ‘माइंड सेट’ असाच असायला हवा. निवडकर्ते आणि प्रशिक्षक याच अंदाजात विचार करू लागतात. कालांतराने हाच विचार संघाची संस्कृती बनते. टीम इंडियात सतत विजयाची भावना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात निर्माण झाली होती.
अल्प समाधानी राहू नका!
आता अल्प समाधानी राहून भागणार नाही. जे काम सोपविले होते, ते पूर्ण झाले. आता काहीच करायचे नाही, ही भावना खेळाडूंमध्ये ज्या दिवशी वाढीस लागेल, त्या दिवसापासून पतनाला सुरुवात झाली, असे समजा! युवा आणि अनुभवी खेळाडूंचा हा संगम टीम इंडियाला दिग्गज संघ म्हणून प्रस्थापित करू शकणार आहे.