Join us

विशेष लेख : रोहित, विराट... तुम्हाला झालंय तरी काय? संघाला खरी गरज असतानाच केलं निराश

सचिन तेंडुलकरला पाहून तुम्ही बॅट हातात घेतली होती. आता त्याच सचिनप्रमाणे टीकेला बॅटने उत्तर द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 08:26 IST

Open in App

रोहित नाईक, उपमुख्य उपसंपादक

सर्वप्रथम तुम्ही दोघांनी ज्या सुखद आठवणी दिल्या, त्यासाठी खूप खूप आभार... रोहित तुला २००७ सालच्या टी-२० विश्वचषकापासून पाहतोय, आजही त्याच नीडरपणे खेळताना पाहताना खूप मस्त वाटतं. विराट, तुझ्यातली आक्रमकता, तुझा जोश आणि सर्वात महत्त्वाची तुझी फिटनेस... तुझे हे गुण कोणालाही हेवा वाटतील असेच आहेत. तुम्हा दोघांचा मैदानावरील बेधडकपणा आम्ही खूप एन्जॉय केला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तुमची कामगिरी पाहून प्रश्न पडतो, तुमची बॅट का शांत झाली? न्यूझीलंड संघ गेल्यावर्षी आपल्या देशात आल्यापासून पाहतोय, एक-दोन नव्हे तर सलग सात-आठ सामन्यांत तुमची बॅट ‘बोलत’च नाही. विराट, तू एका शतकाचा आनंद दिला खरा, पण जेव्हा संघाला खरी गरज होती, तेव्हा मात्र तुम्ही दोघांनी आम्हाला निराश केले. हे आधी असे घडले नव्हते. तुम्हाला नेमकं झालंय तरी काय?

मला युवराज सिंगची एक जुनी जाहिरात आठवतेय, त्यात तो म्हणतो, ‘जब तक बल्ला चल रहा है थाट है, जिस दिन बल्ला नही चला तब...’ त्यात तो असेही म्हणालाय की, ‘यशामध्ये सर्व लोक तुमच्यासोबत असतात, पण जेव्हा अपयश येतं किंवा दुखापती होतात, तेव्हा त्या दु:खातून स्वत:लाच वाटचाल करावी लागते.’ आज तुमची परिस्थिती अशीच झाली आहे. सिडनी कसोटीआधी रोहित तू स्वत:हून संघाबाहेर जाणार असल्याची चर्चा होती. आम्ही हे फारसं मनावर घेतलं नाही. कारण, तुझ्यासारख्या स्टारविना भारतीय संघाचा विचार नाही होऊ शकत. पण, जेव्हा नाणेफेकीला जसप्रीत बुमराहला पाहिले, तेव्हा पहाटे पहाटेच आम्हाला मोठा धक्का बसला. बरं, तू संघाबाहेर बसूनही चित्र काही बदलले नाही.

हरपलेल्या फॉर्ममुळे तू संघहिताचा विचार करुन स्वत: बाहेर राहिला. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. पण, काय साध्य झालं? पुन्हा फलंदाजांनी नांगी टाकलीच ना... त्यात विराट तूही निराश केले. जीवदान मिळाल्यानंतर तू खंबीर उभा राहिलास. तू जबरदस्त कमबॅक करणार, असे वाटताच पुन्हा तू स्लीपमध्ये झेल देऊन परतलास. तू लवकर बाद झाला, याहून जास्त दु:ख झाले ते ६९ चेंडू खेळूनही तू एकदाही चेंडू सीमापार धाडला नाही. आम्ही अनुभवलेला ‘विराट’ तूच का, असा प्रश्न पडला.

दोघांमागे लागलेले अपयशाचे हे चक्र पाहावत नाही. दोघांनी कसोटीतून निवृत्त होऊन केवळ एकदिवसीय सामने खेळावे, असेही म्हटले जात आहे. तुमच्या निवृत्तीवरून आता अनेक मित्रांमध्ये, घरांमध्ये वाद सुरू आहेत. तुमची सध्याची कामगिरी पाहता, कोणालाही असेच वाटू लागेल. पण, ‘दिल है के मानता नहीं’ असे म्हणणाऱ्या आमिर खानसारखी अवस्था झाली आहे.

खेळ म्हटलं की, यश-अपयश हे आलंच. तुम्ही कधीच शून्यावर बाद झाले नाही, असे कधी झालंय का? तर अजिबात नाही. तुम्हीच काय, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग अगदी व्हिव्ह रिचर्ड्सन आणि डॉन ब्रॅडमन हे दिग्गजही शून्यावर बाद झाले आहेत. पण, मुद्दा आहे तो फिनिक्स भरारीचा. २०२३ सालचा आयसीसी विश्वचषक आठवा. किती सहजपणे फायनलमध्ये तुम्ही धडक दिली आणि त्यानंतरही या निर्णायक सामन्यात तुम्हाला अपयश पचवावे लागले होते. पण, काही महिन्यांमध्येच सर्वांच्या नाकावर टिच्चून दिमाखात टी-२० विश्वचषक उंचावला. ही भरारी फिनिक्स पक्ष्यालाही लाजवेल अशीच होती. तुम्ही जे लक्ष्य निर्धारीत केले, ते मिळवलेच. हाच सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला आजही बाळगायचा आहे. तुम्ही पुन्हा कसोटीत पुनरागमन करु शकता, हा आमचा विश्वास आहे. टीकाकारांची चिंता करु नका. तुम्ही दोघांनीही अनेकदा सांगितलंय की, सचिन तेंडुलकरला पाहून तुम्ही बॅट हातात घेतली होती. त्याच सचिनने जेव्हा जेव्हा स्वत:वर टीका झाली, तेव्हा तेव्हा केवळ आणि केवळ बॅटनेच उत्तर दिले. तुम्ही देखील आपल्या आयडॉलप्रमाणेच प्रत्युत्तर द्या.

तुम्ही हे कराल, याची खात्री आहे... फक्त ते केव्हा? एवढाच प्रश्न...

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीसचिन तेंडुलकर