Join us  

विश्वविजेतेपदाचे ऑस्ट्रेलियन वर्तुळ पूर्ण! अश्विनला वगळणे भारताची मोठी चूक!!

कोहली, पुजाराची फटक्यांची निवड चुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 6:22 AM

Open in App

अभिजित देशमुख, थेट लंडनहून

जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माने एक महत्त्वपूर्ण विधान केले होते. तो म्हणाला, भूतकाळात झालेल्या चुकांमधून बोध घेऊन त्या पुन्हा होणार नाहीत याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. पण सव्वाचार दिवसांच्या कसोटी क्रिकेटनंतर भारतीय संघांची गत पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच झाली आहे. संघ निवडीपासून भारतीय संघाच्या चुकांना सुरुवात झाली. त्यानंतर सुमार फलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीत असलेला भेदकतेचा अभाव भारताला विजेतेपदापासून दूर घेऊन गेला. इंग्लंडमधील इतर खेळपट्ट्यांप्रमाणे ओव्हलच्या खेळपट्टीवरसुद्धा गवत होते. मात्र असे असले तरी वेगवान गोलंदाजांना त्यामुळे बळी घेण्यास भरपूर मदत झाली नाही. चेंडूचा टप्पा अचूक ठेवूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जेरीस आणले.

अश्विनला वगळणे मोठी चूक

अंतिम फेरीसाठी कांगारूंनी चार डावखुऱ्या फलंदाजांना अंतिम अकरामध्ये स्थान दिले. मात्र भारताने काय केले तर या चौघांपुढे सर्वाधिक प्रभावी ठरू शकणाऱ्या रविचंद्रन अश्विनला संघातून वगळले. विशेष म्हणजे आजच्या घडीला अश्विन जागतिक क्रमवारीत क्रमांक एक कसोटी गोलंदाज आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाचा हा आत्मघातकी निर्णय होता. त्यानंतर आपले चार प्रमुख वेगवान गोलंदाजही टिच्चून मारा करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे दोन्ही डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी खोऱ्याने धावा लुटल्या.

सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ठरलेल्या रणनीतीनुसार खेळ करण्यात आम्ही काही प्रमाणात अपयशी ठरलो. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पूरक होती. मात्र आम्हाला त्याचा फायदा घेता आला नाही. १७३ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात झटपट गुंडाळणे अपेक्षित होते. पण त्यात आम्ही अपयशी ठरलो. खरे सांगायचे तर पाचही दिवस खेळपट्टीचा नूर फार बदलला नाही. याचा आम्हाला अंदाज होता. म्हणूनच आम्ही चौथ्या डावात फलंदाजी करण्याचे आव्हान पेलले होते. मात्र अपेक्षित खेळ करण्यात आम्ही अपयशी ठरलो.

कोहली, पुजाराची फटक्यांची निवड चुकली

दुसऱ्या डावात कोहलीने भक्कम सुरुवात केली होती. भारताच्या विजयाचा तो प्रमुख शिल्पकार ठरेल अशी अनेक जण आस लावून बसले होते. मात्र बोलंडने त्याची एकाग्रता भंग केली. इतका बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा मोह विराटला टाळता आला असता. पुजाराने तर स्वत:च स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. त्याने खेळलेला फटका समजण्यापलीकडचा होता.

'ओव्हल'वर ऑस्ट्रेलियन विश्वविजयाचा 'सर्कल'

डब्ल्यूटीसी विजेतेपदासोबतच आयसीसीच्या सर्वच स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे. त्यामुळे त्यांनी इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर विश्वविजयाचे सर्कल पूर्ण केले.

  • एकदिवसीय विश्वचषक (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५)
  • टी-२० विश्वचषक (२०२१)
  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (२००६, २००९)
  • जागतिक कसोटी अजिंक्यपद (२०२३)
टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघआर अश्विनचेतेश्वर पुजाराविराट कोहली
Open in App