- स्वदेश घाणेकर
''मुंबई इंडियन्स सलग तीन सामने हरले यार...''''होना, हा हार्दिक पांड्या कॅप्टन झाल्यामुळे हे सगळं होतंय. अंबानींनी रोहितला हटवून पांड्याला कॅप्टन का केले? रोहितने संघाला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आणि त्याच्यासोबत ते असे वागले....''''हार्दिक छपरी, त्याला कुठे टीम सांभाळता येतेय? बस झालं आता रोहितला पुन्हा कॅप्टन करा.. ''
मुंबईच्या गल्लीगल्लीत सध्या हीच चर्चा आणि मागणी आहे. मुंबई इंडियन्सचे फॅन्स म्हणून ही भावना असणे चुकीचे नाही. त्याचा आदर करायलाच हवा. ''इतकी वर्ष रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने मिळवलेले यश एका चुटकीसरशी अंबानी यांनी नजरंदाज केले. ५ जेतेपदं काही खायची गोष्ट नाहीत, तरीपण!''
मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील सुरुवात काही खास झालेली नाही. पण हे असे पहिल्यांदाच घडतंय असेही नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळतानाही मुंबईने पहीले ४ सामने गमावले होते, त्यानंतरही संघ मजबुतीने उभा राहिला आणि जेतेपदापर्यंत पोहोचला होता. मग आताही हे होऊ शकतं, असं मुंबई इंडियन्सच्या सो कॉल्ड डाय हार्ट फॅन्सना का वाटत नाही?
मुंबई इंडियन्स जेव्हा हार्दिकला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या तेव्हा हेच चाहते आनंदाने नाचले होते. कारण, हार्दिक गुजरातकडे गेल्यानंतर मुंबईला पुढील दोन पर्वात त्याची उणीव प्रकर्षाने जाणवली होती. हे सत्य नाकारणे चुकीचे ठरेल. २०२२ मध्ये त्यांची गाडी दहाव्या क्रमांकावर अडकली होती. त्याच वर्षी कर्णधार म्हणून पदार्पण करणाऱ्या हार्दिकने Gujarat Titan's ला जेतेपद पटकावून दिले होते. नवा संघ घेऊन प्रस्थापितांना आव्हान देण्याचे काम त्याने केले. चला पहिल्या पर्वात तुक्का लागला असे अनेकांना वाटले असेल, परंतु त्यांना हार्दिकने २०२३ मध्ये तोंडावर पाडले. संघाला तो पुन्हा फायनलमध्ये घेऊन गेला. अर्थात हे त्याचे एकट्याचे यश नव्हते.. आशिष नेहरासारखा मार्गदर्शक त्याच्यापाठीशी होता. शुबमन गिल, मोहम्मद शमी आदी खेळाडू होते... त्याही पलीकडे त्यांचा १२ वा खेळाडू तगडा होता आणि यंदा मुंबई इंडियन्सचा हाच १२ वा खेळाडू माती खातोय...
पण, लोकांना हे समजत नाही की प्रत्येक संघात स्थित्यांतर होत असते.. रोहित ३६ वर्षांचा आहे आणि तो भारतीय संघाचा कर्णधारही आहे. त्याच्यावरील जबाबदारीचा भार कमी होणे गरजेचे असताना मुंबई इंडियन्सच्या संघात नवे नेतृत्व उभे राहणेही गरजेचे आहे. हे रोहित संघात असताना घडणे महत्त्वाचे आहे आणि म्हणून संघ मालकांनी हा निर्णय घेतला आहे. संघ म्हणजे एक व्यक्ती नाही, तर तो ११ खेळाडूंचा संच असतो. भारतात व्यक्ती पूजेची कीड खूप खोलवर गेलेली आहे आणि त्यामुळे अशी संतप्त भावना लगेच व्यक्त होतात, मग त्याने संघाचे नुकसान झाले तरी चालेल. मुंबई इंडियन्सच्या बाबतीत हेच होतंय.
रोहितला हटवलं मग आता हार्दिकला जगू द्यायचं नाही, असा निर्धारच चाहत्यांनी केलेला दिसतोय. रोहितच्या नेतृत्वाखाली संघ जेव्हा हरत होता तेव्हा प्रेक्षकरूपी १२ वा खेळाडू त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. म्हणून संघ भरारी घेऊ शकला आणि हाच १२ वा खेळाडू व्यक्ती पूजेत अडकून संघाचे खच्चीकरण करतोय. आपण एखादं चांगलं काम करायला सुरुवात कारायच्या आधीच कुणी नकारघंटा वाजवली तर आपलाही फोकस हलतोच ना? तसेच जेव्हा हार्दिक टॉससाठी आल्यावर त्याच्या नावाने शिमगा केला, तर पुढे तो खाक चांगलं काम करू शकतो. आपलीच माणसं विरोधात आसल्यावर प्रतिस्पर्धीशी कसे काय लढावे? हे सध्या हार्दिकला शिकावे लागेल.
वानखेडे स्टेडियमवर समालोचन मांजरेकरला Behave असा दम प्रेक्षकांना द्यावा लागला. प्रेक्षकांचे वागणे पाहून हार्दिकचा रडवेला चेहरा बरंच काही सांगून जात होता आणि तिथेच त्याची सामन्यात हार झाली होती. हार्दिक वशील्यानं इथपर्यंत पोहोचलेला नाही. प्रचंड मेहनत आणि चिकाटीने त्याने ही भरारी घेतलीय... एक विसरता कामा नये की तोही आयपीएल विजेता कर्णधार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या अपयशाला तोच नाही तर १२ वा खेळाडू म्हणजे सो कॉल्ड प्रेक्षकही जबाबदार आहेत.. त्यामुळे आता टॉसच्या वेळी हार्दिकचा उत्साह वाढवा अन् मग बघा संघ कसा भरारी घेतो...
हा सांघिक खेळ आहे, व्यक्तिपूजा करा पण त्याला संघाच्या पुढे ठेवू नका!!!