मुंबई, दि. 15 - महिला ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करणा-या इंग्लंड क्रिकेट संघाच्या एका अष्टपैलू महिला खेळाडूला विराट कोहलीने स्पेशल गिफ्ट दिलं आहे. विराटने गिफ्ट दिल्यामुळे या महिला क्रिकेटरचा आनंद गगनात मावेनासा झालाय. 26 वर्षीय या महिला क्रिकेटरने ट्विटरद्वारे विराटने गिफ्ट दिल्याची माहिती दिली.
पुरूषांच्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारताला अंतिम फेरीपर्यंत पोचविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या विराट कोहलीला इंग्लंडची 22 वर्षीय क्रिकेटर डॅनियल वेट हिने लग्नाची मागणी घातली होती. कोहली माझ्याशी लग्न कर असा संदेश तिने ट्विटरवरून दिला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर डॅनिएलने हे ट्विट केले होते.
विराटने इंग्लंडची ऑलराउंडर डॅनी वेट हिला आपली बॅट गिफ्ट केली आहे. या आठवड्यातच ट्रेनिंगला पुन्हा सुरूवात केली. विराट कोहलीचे आभार मानताना त्याने दिलेल्या बॅटचा वापर करण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही असं ट्विट करून तिने विराटने बॅट गिफ्ट दिल्याची माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये तिने बॅटचा उल्लेख करताना इंग्रजीत बिस्ट असा केला. म्हणजे ती बॅट आपल्या विरोधकांवर क्रूरपणे हल्ला करते असं तिने म्हटलं आहे. विराटने दिलेल्या बॅटचाही फोटो तिने सोबत शेअर केला असून या बॅटच्या खाली विराट कोहली असं नाव लिहिलं आहे.
यापूर्वी ट्विटरवरून थेट लग्नाचं प्रपोजल मांडणाऱ्या डॅनियल वेटची विराटने भेट घेतली होती. त्यावेळी विराट आणि डॅनियलचे फोटो डॅनियलचा भाऊ मॅक्स वेट याने क्लिक केले होते. हे फोटो ट्विटरवर अपलोड करताना त्याने ‘दिस वुड मेक अ क्यूट कपल…हाहाहा.’ असं कॅप्शन दिलं होतं. डॅनियलच्या प्रपोजमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.
...म्हणून विराट कोहलीने नाकारली तब्बल 2 कोटींची ऑफर-
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सॉफ्ट ड्रिंक कंपनीची कोट्यवधींची ऑफर नाकारली आहे. द हिंदू ने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार कोहली स्वतः कोणतंच सॉफ्ट ड्रिंक पित नाही त्यामुळे त्याने सॉफ्ट ड्रिंक कंपनीसोबत करार देण्यास नकार दिला आहे.
मी स्वतः ज्या गोष्टींचा वापर करतो त्याच गोष्टींचा प्रचार करतो असं कोहलीने म्हटलं आहे. कोहलीच्या कठोर ट्रेनिंगमध्ये सॉफ्ट ड्रिंक्ससाठी कोणतीही जागा नाही. स्वतःला फिट ठेवायला तो तासंतास जिममध्ये घाम गाळत असतो.
यापूर्वी जूनमध्ये कोहलीने पेप्सीला जाहीरात करण्यास नकार देवून मोठा झटका दिला होता. कोहली गेल्या सहा वर्षांपासून पेप्सी या शीतपेयाची जाहिरात करत होता. करार संपत आल्यावर पेप्सीने हा करार पुढे वाढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्या गोष्टी मी स्वतः खात, पीत नाही, त्या मी दुसऱ्यांना कसे काय खाण्यास सांगू शकतो’, असे सांगत विराट कोहलीने पेप्सीला मोठा धक्काच दिला होता. विराट पेप्सीची जाहिरात न करण्यावर स्पष्टीकरण देताना म्हणाला की, याआधी ज्या गोष्टींचा मी स्वीकार केला होता, ज्यांचा उल्लेख मी आता करू इच्छित नाही, त्यांच्यासोबत स्वतःला जोडू शकत नाही. साखर आणि कार्बोनेटेड पेयांमुळे आरोग्यावर होणारा परिणाम आणि वाढता धोका सध्या चर्चेचा विषय असून यादरम्यानच विराट कोहलीने हा निर्णय घेतला होता.
2001 मध्ये माजी बॅडमिंटन खेळाडू पुलेला गोपीचंद यांनीही अशाच प्रकारची ऑफर नाकारली होती. 2001 मध्ये ऑल इंग्लंड खिताब जिंकल्यानंतर त्यांना सॉप्ट ड्रिंकची जाहीरात करण्याची ऑफर मिळाली होती. पण स्वतः सॉफ्ट ड्रिंक पित नसल्यामुळे अशा अपायकारक गोष्टींचा प्रचार करणार नाही असं म्हणत त्यांनी जाहीरात करण्यास नकार दिला होता.