मुंबई : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक राहुल द्रविड यांच्यामध्ये एक खास बैठक होणार असल्याचे समजते आहे. या बैठकीमध्ये भारताच्या दोन गोलंदाजांच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
सध्याच्या घडीला भारताचे काही गोलंदाज जायबंदी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतग्रस्त झाला होता. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला आता आयपीएलही खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे.
द्रविड यांनी काही दिवसांपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची फिटनेस चाचणी करायला नकार दिला होता. कारण दुखापतग्रस्त झाल्यावर बुमराह हा राष्ट्रीय अकादमीमध्ये आला नव्हता. त्यामुळे द्रविड यांनी बुमराची फिटनेस टेस्ट घ्यायला नकार दिला होता.
बुमराबरोबरच भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारही जायबंदी आहे. त्याच्या फिटनेसबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. याबाबतची विचारणा द्रविड यांच्याकडे करण्यात आली होती. पण काही चाचण्या त्यावेळी बाकी होत्या.
भारताच्या या गोलंदाजांच्या भवितव्याबाबत गांगुली आणि द्रविड यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. हे गोलंदाज कधी फिट होऊ शकतील, त्यांचे पुनर्वसन कसे होत आहे, याबाबत गांगुली द्रविड यांच्याकडून माहिती घेणार असल्याचे समजते आहे.