मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विराट कोहलीने विश्रांती घेतली होती. पण आता कसोटी मालिकेसाठी त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी आता कोहलीने कंबर कसली आहे. या कसोटी सामन्यासाठी कोहलीने खास सराव केल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतीय संघ सध्या इंदूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यासाठी दाखल झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्याला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ काल इंदूरमध्ये दाखल झाला आहे. पण आज भारताचा कर्णधार विराट कोहली हा इंदूरच्या एका गल्लीमध्ये अवतरल्याचे पाहायला मिळाले.
विराटला बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. यावेळी भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सुपूर्द करण्यात आले होते. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली होती. नागपूर येथील सामन्यापूर्वी ही मालिका १-१ अशी बरोबरीत होती. पण भारताने नागपूरमध्ये ३० धावांनी विजय मिळवला आणि मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली.
कोहलीने यावेळी गुलाबी चेंडूने सराव करणे पसंत केले. कारण दुसरा कसोटी सामना कोलकाता येथे इडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात पहिल्यांदाच गुलाबी चेंडू वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्याचा सरावही कोहलीने यावेळी केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर नेट्समध्ये कोहलीने बचाव करण्याचा सराव केला.
भारताची ट्वेन्टी-२० मालिका सुरु असताना कोहली विश्रांती घेण्यासाठी पत्नी अनुष्का शर्माबरोबर भूतान येथे गेला होता. पण आता कसोटी सामन्यासाठी तो इंदूरमध्ये दाखल झाला आहे. इंदूरमध्ये दाखल झाल्यावर कोहली श्रीजीवेली कॉलेजमध्ये शुटींसाठी आला होता. यावेळी तेथील मुलांबरोबर कोहली क्रिकेट खेळला आणि त्यांच्याबरोबर सेल्फीही काढले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.