- अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार
यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात जास्त रक्कम मिळाली ती बेन स्टोक्स याला. गेल्या वर्षापेक्षा दोन कोटी कमी मिळाले आहेत. तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तरी माझ्या मते या लिलावातील सर्वात मोठी कहाणी आहे ती राशीद खानची. अफगाणचा लेग स्पिनर राशिद फक्त १९ वर्षांचा आहे. गेल्या वर्षी तो हैदराबादकडून खेळला होता. यंदा हैदराबादने राईट टू मॅच कार्डचा वापर करून त्याला ९ कोटी रुपयांत संघात घेतले. तो जगातील जवळपास सर्वच लीगमध्ये खेळला. त्याने अफगाण क्रिकेटचा चेहरा मोहराच बदलून टाकला. अफगाण आता कसोटी क्रिकेटही खेळत आहे. या वर्षी भारताविरोधात त्यांचा सामना आहे. कसोटीत काय करू शकतो हे महत्त्वाचे ठरेल. तो त्याच्या देशासाठी एक प्रेरणास्त्रोत बनला. अफगाणकडे क्रिकेट संस्कृती नाही मात्र आता ९ कोटींचा हा खेळाडू आहे.
आयपीएलचा दुसरा पैलू आहे ३५ वर्षांवरील खेळाडूंना फारशी पसंती मिळत नाही. लसीथ मलिंगा आणि ख्रिस गेल या दिग्गज टी २० खेळाडूंनाच पहिल्या फेरीत खरेदीदार मिळाला नाही. भारतीय क्रिकेटचे महारथी युवराज सिंग, हरभजन सिंग, गौतम गंभीर हे बेस प्राईजवर विकले गेले आहेत. युवराज पंजाबकडे परत गेला. गंभीर केकेआर ऐवजी दिल्लीकडे गेला. तीन वर्षांसाठी हा खेळाडू आपल्या संघातून खेळेल तेव्हा त्याचे मूल्य काय असावे, खेळाडू कसे असावे यावर प्रत्येक फ्रेंचायझीने विचार केला आहे. त्यामुळे ३५ वर्षांवरील खेळाडू हे संघ मालकांच्या पसंतीतून बाद झाले आहेत.
अष्टपैलू खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाचे आहे. त्यासोबतच यष्टिरक्षक फलंदाजांनाही मागणी आहे. संजू सॅमसन, इशान किशन, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा हे याचेच उदाहरण आहे. त्यासोबतच लेग स्पिनरलाही मागणी आहे. राशिदसोबतच अमित मिश्रा, पीयूष चावला यांना मागणी आहे. आयपीएलचा इतिहास पाहिला तर हे खेळाडू सामने जिंकून देऊ शकतात.
युवा खेळाडूंना मोठी मागणी या लिलावात मिळाली. १९ वर्षाआतील खेळाडू शुभम गिल, नागरकोटी, पृथ्वी शॉ यांनादेखील चांगली रक्कम मिळाली. शकील खान, सैनी यांनादेखील चांगली मागणी आहे.
युवा खेळाडूंना मिळणारी संधी हे आयपीएलचे वैशिष्ट्य आहे. चार परदेशी खेळाडू आणि आठ दिग्गज खेळाडू संघात आल्यावर इतर जागा या युवा खेळाडूंना मिळतात.
टी २० तील दिग्गज खेळाडू ख्रिस लीन याला चांगली रक्कम मिळाली. मात्र इंग्लंडचा कर्णधार जो रुट याच्याकडे दुर्लक्ष झाले. इंग्लंडचे खेळाडू पूर्ण सत्र खेळू शकणार नाही, असे मानले जाते. त्यामुळे जोश बटलर, जॉनी बेअरस्टो या सारख्या चांगल्या खेळाडूंना मागणीच नव्हती नाही. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक आहे त्यामुळे ते या सत्रात व्यस्त असतील. तेथेही लीग सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. आता रविवारी होणाºया लिलावात पुन्हा त्यांना संधी आहे त्या वेळी काय होते हे पाहणे रंजक ठरेल.
Web Title: The speech of Rashid Khan is typical
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.