भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्या दमदार कामगिरीसमोर सध्या आकाशही ठेंगणे दिसत आहे. वर्षभरापूर्वी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० संघात संधी मिळालेल्या सूर्याने स्फोटक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियातील स्थान मजबूत केले. कालच त्याने न्यूझीलंडविरुद्ध ५१ चेंडूंत नाबाद १११ धावा कुटल्या. त्याच्या या यशामागचं रहस्य सूर्याने स्वतः सांगितले.
सूर्यकुमार यादवने ट्वेंटी-२० क्रिकेटमधली ३० डावांमध्ये ४७.९५च्या सरासरीने ११५१ धावा केल्या आहेत आणि त्यात दोन शतकं व ९ अर्धशतकं झळकावली आहेत. किवींविरुद्धची त्याची नाबाद १११ धावांची खेळी ही भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम चौथी वैयक्तिक खेळी ठरली. या विक्रमात विराट कोहली १२२* ( वि. अफगाणिस्तान, २०२२), रोहित शर्मा ११८ ( वि. श्रीलंका, २०१७) आणि सूर्यकुमार ११७ ( वि. इंग्लंड, २०२२) हे आघाडीवर आहेत.
सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) भारताच्या १९१ धावांपैकी १११ धावा चोपल्या. कॅलेंडर वर्षातील त्याचे हे ट्वेंटी-२०तील दुसरे शतक ठरले आणि रोहित शर्मा ( १०२८) याच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या लोकेश राहुलच्या विक्रमाशी सूर्याने बरोबरी केली. रोहित शर्मा चार शतकांसह आघाडीवर आहे.
न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव पहिला भारतीय फलंदाज आहे. शिवाय इंग्लंड व न्यूझीलंडमध्ये शतक करणाराही तो पहिला भारतीय आहे. Mount Maunganui येथे चार पाहुण्या फलंदाजांनी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्याला त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीबाबतचे रहस्य काय असे विचारले गेले. त्यावर तो म्हणाला,''मी माझ्या झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. माझी पत्नी क्रिकेट दौऱ्यादरम्यान माझ्यासोबत असते. जेव्हा क्रिकेट मॅच नसते तेव्हा मी तिच्यासोबत वेळ घालवतो आणि रोज घरच्यांशी ३० मिनिटे गप्पा मारतो. तेव्हा ते क्रिकेटबाबत चर्चा करत नाही. माझे पाय जमिनीवर ठेवण्यास ते मदत करतात. त्यांच्या गप्पांमुळे मानसिक ताण हलका होतो. याने मला खूप मदत मिळते.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: ’Spend time with wife & 30 Mins call with my parents everyday’; SuryaKumar Yadav’s success mantra
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.