नवी दिल्ली : भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याने शुक्रवारी आंतरराष्टÑीय आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमधून तात्काळ प्रभावाने निवृत्ती जाहीर केली. ओझाने २०१३ ला वेस्ट इंडिजविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटीत आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला होता. विशेष म्हणजे त्या सामन्यात तो सामनावीरही ठरला होता. ओझाने २००९ ते २०१३ या कालावधीत २४ कसोटीत ११३ गडी बाद केले.
टिष्ट्वट करीत तो म्हणाला, ‘मी आंतरराष्टÑीय आणि प्रथमश्रेणीतून तात्काळ प्रभावाने निवृत्त होत आहे.’ या निर्णयामागील कारण मात्र त्याने सांगितले नाही. ‘भारतासाठी खेळणे माझे स्वप्न होते. चाहत्यांकडून भरपूर प्रेम लाभले. सचिनकडून कसोटी कॅप मिळणे अविस्मरणीय क्षण होता. हा क्षण शंभर कसोटी बळी घेतल्यासारखाच होता.’ कारकिर्दीच्या सुरुवातीला ओझाने कसोटीत अश्विनसोबत यशस्वी जोडी बनविली. विंडीजविरुद्ध २०११ च्या मालिकेत २० आणि न्यूझीलंडविरुद्ध १३ गडी बाद केले होते. कारकिर्दीमध्ये अनेक चढउतार पाहिल्याचे सांगून ओझा म्हणाला, ‘मेहनत आणि समर्पित भावनेसह प्रशिक्षक, ट्रेनर, चाहते, सहकारी खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाची जी साथ लाभली त्यामुळे माझी वाटचाल सोपी झाली.’ (वृत्तसंस्था)