Glenn Phillips Dhananjaya de Silva, Super Spin Clean Bowled Video: न्यूझीलंडविरूद्ध श्रीलंकेच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय फलंदाजांनी काही अंशी बरोबर ठरवला. पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेने ७ गड्यांच्या मोबदल्यात ३०२ धावांपर्यंत मजल मारली. कमिंडू मेंडिसचे शतक (११४) आणि कुसल मेंडिसचे अर्धशतक (५०) यांच्या बळावर लंकेने त्रिशतकी मजल मारली. सामन्यात एका कर्णधाराने उत्तम स्पिन गोलंदाजीचा नमुना दाखवत दुसऱ्या कर्णधाराचा काटा काढला.
श्रीलंकेच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर दिमुथ करूणरत्ने २ धावांत तर पाथुम निसांका २७ धावांवर माघारी परतला. अनुभवी दिनेश चंडीमल (३०) आणि अँजेलो मॅथ्यूज (३६) जोडीने संघाला शतक गाठून दिले. त्यानंतर कामिंडू मेंडिसने एक बाजू लावून धरली पण दुसऱ्या बाजूने कर्णधार धनंजय डि सिल्वा ११ धावांवर त्रिफळाचीत झाला. न्यूझीलंडचा कर्णधार ग्लेन फिलिप्स याने अप्रतिम ऑफ स्पिन गोलंदाजी करत योग्य टप्प्यावर चेंडू टाकून त्याची दांडी गुल केली. पाहा व्हिडीओ-
कर्णधार बाद झाला पण कामिंडू मेंडिसने आपली झुंज सुरूच ठेवली. त्याने १७३ चेंडूत ११४ धावांची दमदार शतकी खेळी करून दाखवली. त्याला कुसल मेंडिसची चांगली साथ लाभली. कुसल मेंडिसने ६८ चेंडूत ५० धावा केल्या. या दोघांच्या विकेटनंतर फार काळ खेळ झाला नाही. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेने ७ बाद ३०२ धावा केल्या. यात १८ अतिरिक्त धावांचाही समावेश आहे. न्यूझीलंडकडून विल ओ'रूरकेने सर्वाधिक ३, ग्लेन फिलिप्सने २ तर टीम साऊदी, एजाझ पटेलने १-१ बळी टिपला.