विशाखापट्टणम - प्रथम फलंदाजी करताना उपुल थरंगाच्या 95 धावांच्या बळावर श्रीलंकेनं 44 षटकांत सर्वबाद 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. एकवेळ श्रीलंका 300 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत असताना भारतीय फिरकीच्या जाळ्यात लंकेचे फलंदाज अडकले. भारतापुढे विजयासाठी 216 धावांचे मापक आव्हान ठेवलं आहे. भारताकडून चहल आणि कुलदिपने प्रत्येकी तीन बळी घेतले तर. पांड्यानं दोन आणि भुवनेश्वर व बुमराहनं प्रत्येकी एक- एक विकेट घेतली. उपुल थरंगाशिवाय श्रीलंकेच्या सदिरा समरविक्रमानं 42 धावा केल्या. भारताच्या फिरकीपुढे लंकेच्या इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या.
तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्का बसला. चौथ्या षटकात धनुष्का गुणतिलका 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर उपुल थरंगानं सर्व सुत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी सुरु केली. सलामीवीर उपुल थरंगानं हार्दिक पंड्याच्या एकाच षटकात पाच चौकारांची बरसात करत आपला फॉर्म दाखून दिला. थरंगानं 95 (82) धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं तीन षटकार आणि 12 चौकार लगावले. 28 व्या षटकात कुलदिप यादवनं थरंगाचा अडथळा दूर केला. कुलदिपच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्यासाठी ख्रिस सोडून बाहेर जाणाऱ्या थरंगाला महेंद्रसिंग धोनीच्या चपळ यष्टीरक्षणामुळे 95 धावांवर बाद व्हाव लागलं. थरंगानंतर त्याच षटकात कुलदिपनं निरोशन डिकवेला 8 धावांवर बाद करत सामन्यात भारताची बाजू मजबूत केली. अनुभवी मॅथ्यूजही फार कमाल दाखवू शकला नाही. चहलच्या गोलंदाजीवर मॅथ्यूज (17) धावांवर बाद झाला.
आजची लढत जिंकून 1-1 अशा बरोबरीत असलेल्या मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा असेल. आजच्या लढतीसाठी भारतीय संघान एक बदल करण्यात आला असून, कुलदीप यादव याचे संघात पुनरागमन झाले. श्रीलंकेविरुद्ध विजय मिळविण्याच्या, तसेच मालिका खिशात घालण्याच्या निर्धारासह भारतीय संघ खेळत आहे. या मैदानावर भारताने २०१५ चा अपवाद वगळता सामना गमाविलेला नाही, हे विशेष. दुसरीकडे आठ मालिका गमाविणारा लंकेचा संघदेखील पहिल्यांदा द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या आशेने उतरणार आहे. मोहालीत कर्णधार रोहित शर्माच्या द्विशतकी खेळीच्या बळावर भारताने सहज विजय नोंदविला. त्याआधी धर्मशालातील पहिला सामना लंकेने जिंकला होता. भारताने विशाखापट्टणममध्ये सात सामने खेळले. केवळ एक सामना गमावला आहे.