इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये १६ वर्षांचा फिरकीपटू फरहान अहमद याने इतिहास रचला आहे. नॉटिंघमशायरकडून खेळणाऱ्या या युवा गोलंदाजाने सरे विरुद्ध दोन्ही डावात मिळून १० विकेट्स घेत खास विक्रम आपल्या नावे केला. फरहान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका सामन्यात १० विकेट घेणारा क्रिकेट जगतातील सर्वात युवा गोलंदाज ठरलाय. आपल्या फिरकीच्या जोरावर त्याने सामना अनिर्णित ठेवण्यात मोलाची कामगिरीही बजावली.
१० विकेट्स घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरला फरहान; याआधी कुणाच्या नावे होता रेकॉर्ड
फरहान याने एका सामन्यात १० विकेट्स घेताच क्रिकेटच्या इतिहासातील १५९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला. याआधी १८६५ मध्ये WG ग्रेस यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली होती. १६ वर्षे ३४० वयात हा रेकॉर्ड सेट झाला होता. जो आतापर्यंत अबाधित होता. फरहान याने १६ वर्षे ११९ दिवस या वयात हा पराक्रम करून दाखवला आहे. आधी पंजा मारला, मग विक्रम आणखी खास केला
पहिल्या डावात फरहान याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. यासह त्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा सर्वात युवा गोलंदाजाचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला. त्यानंतर दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेत त्याने आणखी एका खास विक्रमाला गवसणी घातली.
महा-पराक्रम करण्याआधी वर्ल्ड कपही खेळलाय
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या फरहान अहमद याने इंग्लंडच्या अंडर १९ संघातून वर्ल्डकपही खेळला आहे. यावर्षीच त्याला प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यात संधी मिळाली आहे. पहिल्या दोन प्रथम श्रेणी सामन्यात त्याने १३ विकेट घेतल्या आहेत.