- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात
इडन गार्डन स्टेडियमवर चार दिवसांपुर्वीच कोलकाता नाइट रायडर्स संघावर पहिल्यांदा आम्ही विजय मिळवला. हा एक शानदार विजय असून कायम आमच्या स्मरणात राहिल. सनरायझर्स हैदराबादने आपल्या घरच्या मैदानावरील कामगिरीतील सातत्य बाहेरही कायम राखले. शिवाय ज्या प्रकारे हैदराबाद संघाने बलाढ्य संघाविरुद्ध विजयी कामगिरी केली, ते पाहून मला अभिमान वाटतो.
पुन्हा एकदा गोलंदाजांनी विजयाचा पाया रचताना नियंत्रित मारा केला. यानंतर शांत आणि चतुर कर्णधार केन विलियम्सनने आपल्या कल्पक नेतृत्वाने धावांचा यशस्वी पाठलाग केला. जेव्हा अखेरच्या क्षणी काही गोष्टी चुरशीच्या होतात, तेव्हा अनुभवी खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरते आणि हीच कामगिरी याआधी केकेआरकडून खेळलेल्या शाकिब अल हसन आणि युसुफ पठाण यांनी बजावली.
मनिष पांडेने फलंदाजीत अपेक्षित कामगिरी केली नसली, तरी त्याने दोन अप्रतिम झेल घेत त्याने आपले महत्त्व पटवून दिले. केवळ सनरायझर्सच नाही, तर सर्वच फ्रेंचाइजी संघांनी लक्षवेधी क्षेत्ररक्षण केले. तसेच, संघामध्ये प्रत्येक खेळाडू एकमेकांविरुद्ध स्पर्धा करत असून याचा फायदा भारतीय संघाला होत आहे. यामुळेच जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण असलेला संघ म्हणून भारताची गणना होते.
आता, सनरायझर्स गुरुवाती किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर मोहाली येथे खेळेल. पंजाबने याआधीच आपला संघ किती समतोल आहे हे दाखवून दिले आहे. तरी सलग तीन विजयांमुळे आत्मविश्वास दुणावला असल्याने, आम्ही त्यांना नमवू शकतो, याची खात्री आहे.
याआधी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुद्ध पंजाबने पहिल्यांदाचा त्यांचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला संधी दिली. त्याने जबरदस्त खेळी करत आपला हिसका दाखवला. खरं म्हणजे त्या सामन्यात दोन शानदार खेळी झाल्या. महेंद्रसिंग धोनीने आक्रमक खेळी करत संघाला चांगल्या स्थितीत आणले. दरवेळी या दोघांपैकी एका दिग्गजाची खेळी युवा खेळाडूंसाठी पर्वणी ठरते. या दोघांच्या खेळीतून खूप काही शिकण्याची संधी युवांना मिळते.
गेल, धोनी, संजू सॅमसन, आंद्रे रसेल, शिखर धवन, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली या स्टार फलंदाजांनी आतापर्यंत स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचवेळी, नवोदित खेळाडू विशेष करुन विदेशी खेळाडूंना नव्या खेळपट्टीशी जुळवून घेताना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण हे केवळ काही वेळेपुरता असून परिस्थितींशी जुळवून घेतल्यानंतर ते देखील आपली छाप नक्की पाडतील.
यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत खूप षटकार नोंदवले गेले. विशेष म्हणजे वेगवान गोलंदाजांविरुद्ध शानदार षटकार मारले गेले. त्यातुलनेत फिरकीपटू आणि विशेष करुन मनगटी फिरकी गोलंदाज यशस्वी ठरले आहेत. हे टी२० क्रिकेटची खासियत नाही, तर प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये सातत्याने बळी मिळवणाऱ्या मनगटी फिरकीपटूंचे महत्त्व कळते आणि हे क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचे आहे.
Web Title: Spinners impressed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.