नवी दिल्ली : गलवानमध्ये भारत आणि चीन सैन्यामध्ये असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे सध्या देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. देशातील अनेक भागात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. काही भागांमध्ये राजकीय पक्षांनी चीनच्या मालाची होळीही केली. बीसीसीआय आयपीएलच्या १३ व्या पर्वाचे आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. आयपीएलचा मुख्य प्रायोजक विवो असल्यामुळे बीसीसीआयला गेल्या काही दिवसात भारतीय चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. जनभावनेचा आदर करत बीसीसीआयने चीनच्या कंपनीसोबतच्या करारावर विचार करण्याची तयारी दाखवली आहे. पुढील आठवड्यात आयपीएल संचालन परिषदेची बैठक पार पडणार आहे.या बैठकीत आयपीएलच्या प्रायोजकत्वाबद्दल विचार करण्यात येईल, अशी माहिती आयपीएलच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर देण्यात आली आहे.
याआधी बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी बीसीसीआयची बाजू स्पष्ट केली. १३ व्या पर्वात विवोचे प्रायोजकत्व रद्द करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे त्यांनी दोन दिवसाआधीच सांगितले होते. पुढील वर्षासाठी बीसीसीआय प्रायोजकाचा नक्की फेरविचार करेल, असे ते म्हणाले होते. सरकारने चीनच्या मालावर आणि आणि कंपन्यांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यास बीसीसीआयही त्याचे पालन करेल, असे धुमल यांनी स्पष्ट केले. धुमल यांच्या वक्तव्यानंतर समाज माध्यमांवर चाहते बीसीसीआयच्या या निर्णयावर समाधानी नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामळे बॅकफूटवर आलेल्या बीसीसीआयने चीनच्या कंपनीसोबतच्या करारावर विचार करण्याची तयारी दाखवली आहे. (वृत्तसंस्था)
काय म्हणाले धुमल...
‘२०१८ साली बीसीसीआय आणि विवो कंपनीत पाच वर्षांचा करार झाला होता. त्यासाठी विवोने २१९९ कोटी रुपये मोजले.आयपीएलच्या प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये कंपनीकडून मिळतात ‘भविष्यात बीसीसीआयचे कोणतेही काम चीनच्या कंपनीला देणार नाही. चीनच्या कंपनीला पाठिंबा देणे आणि भारतीय स्पर्धेसाठी त्यांची मदत घेणे, यामधील फरक आपल्याला समजवून घ्यावा लागेल. कंपनीकडून मिळणाऱ्या निधीवर बीसीसीआय नियमित कराचा भरणा करते. भारतीय अर्थव्यवस्थेला ही मोठी मदत आहे,’ या शब्दात धुमल यांनी बीसीसीआयची बाजू मांडली.
Web Title: The sponsor will be reconsidered, a decision is expected at the board meeting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.