राजकोटच्या पहिल्या कसोटीसाठी १२ खेळाडूंची घोषणा होताच १८ वर्षाच्या पृथ्वी शॉच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला. गेल्या दोन वर्षांत पृथ्वीने शानदार कामगिरी केल्यामुळे भारतीय संघात खेळण्याचा तो हकदार ठरतो. ज्युनियर स्तरावर आणि ‘अ’ संघातून त्याने स्वत:ची प्रतिभा सिद्ध केली. लोकेश राहुलच्या सोबतीने तो सलामीला अविस्मरणीय कामगिरी करू शकतो. मयंक अग्रवालला पहिल्या सामन्यात संधी मिळालेली नाही. ओव्हलवर करुण नायरऐवजी अनुमा विहारीला संधी देण्यात झालेल्या चुकीची पुनरावृत्ती त्यांना करायची नाही. मयंक अग्रवालबाबत नायरसारखी स्थिती नाही. मयंकवरून आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो.
भारत या सामन्यात दोन वेगवान आणि तीन फिरकीपटूंसह खेळणार आहे. रिषभ पंतने ओव्हलवर चांगली फलंदाजी केली पण अश्विनने चारही शतके विंडीजविरुद्ध ठोकली आहेत. जडेजा तर अष्टपैलू आहेच आणि कुलदीपकडे डोळेझाक करता येणार नाही. २०१३ च्या तुलनेत यंदाचा विंडीज संघ उत्कृष्ट वाटतो. पण भारतीय फिरकी मारा खेळणे त्यांच्या फलंदाजांसाठी आव्हान असेल. शेनॉन गॅब्रियलसारखा ताशी १५० किमी वेगवान मारा करणारा गोलंदाज संघात आहे. केमार रोचसारख्या अनुभवी खेळाडूस मात्र संघ मुकणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत विजयाचा प्रबळ दावेदार आहेच पण २०१३ च्या मालिकेप्रमाणे दोन्ही लढती तितक्या सोप्या नसतील.