Champions Trophy 2025 News: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेटची भलतीच क्रेझ आहे. पण, आयसीसी टूर्नामेंट वगळता हे दोन्ही संघ आमनेसामने येत नाहीत. याला केवळ आशिया चषकाचा अपवाद आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटच्या वेळी २००६ मध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेकदा यजमानपद सांभाळण्याची तयारी दाखवली पण भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दर्शवला. पण आगामी काळात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ तिकडे जाणार का याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत.
भारत सरकारचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या पर्वाबद्दल भाष्य केले आहे. भारतीय संघ आगामी काळात पाकिस्तानात जाणार का या प्रश्नावर ठाकूर यांनी सावध उत्तर दिले. ते म्हणाले की, हा निर्णय घेण्याचा अधिकार बीसीसीआयचा आहे. पण जेव्हा मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो तेव्हा मी स्पष्ट केले होते की, दोन गोष्टी एकाच वेळी खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यांनी दहशतवादाला पाठिंबा द्यावा, गोळीबार करावा, बॉम्बस्फोट करावा आणि आपण एकत्र क्रिकेट खेळण्यावर बोलणे हे कसे काय शक्य आहे. त्यांनी सर्वप्रथम दहशतवादाला आळा घालावा. त्यानंतर पुढील गोष्टीवर भाष्य करण्यात अर्थ आहे. जोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरू राहतील तोपर्यंत भारताने पाकिस्तानात संघ पाठवू नये या विचाराचा मी आहे. मी बोर्डाचा अध्यक्ष असताना देखील यावर ठाम होतो आणि आता देखील हे धोरण बोर्ड ठरवेल.
मागील वर्षी पार पडलेल्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण, सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने आपला संघ तिकडे पाठवण्यास नकार दर्शवला. मग टीम इंडियाचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी अर्थात श्रीलंकेत खेळवले गेले. श्रीलंकेतच या स्पर्धेचा अंतिम सामना झाला ज्यात भारताने विजय मिळवला. श्रीलंका आणि भारत हे संघ अंतिम फेरीत पोहोचले होते.
Web Title: Sports Minister Anurag Thakur clarified that the BCCI will decide whether the India vs Pakistan Champions Trophy 2025 team will go to Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.